3BHK फ्लॅट 'काश्मिरी फळे' ठेवण्याच्या नावाखाली घेतला अन्...; डॉक्टर मुजम्मिलची स्फोटके लपवण्याची सगळी Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:14 IST2025-11-27T14:11:35+5:302025-11-27T14:14:05+5:30
Delhi Blast Doctor Muzammil shakeel: दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करत असताना एनआयएला मुख्य संशयित आरोपी मुजम्मिल शकील यांचे दोन अड्डे सापडले आहेत. फरिदाबादमध्ये त्याने काश्मिरी फळे ठेवण्याच्या नावाखाली घरे भाड्याने घेतले होते.

3BHK फ्लॅट 'काश्मिरी फळे' ठेवण्याच्या नावाखाली घेतला अन्...; डॉक्टर मुजम्मिलची स्फोटके लपवण्याची सगळी Inside Story
Delhi Blast NIA Breaking News: लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात अटकेत असलेला मुख्य संशयित आरोपी डॉ. मुजम्मिल शकील यांच्या कारनाम्यांबद्दल तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुज्जम्मिलने खोटी माहिती देऊन माजी सरपंचाचे तीन बेडरुम असलेले घर भाड्याने घेतले होते. काश्मिरी फळे ठेवण्यासाठी घर हवे असल्याचे त्याने सांगितले होते. हे घर बघण्यासाठी तो डॉक्टर शाहीन शाहीदसोबत गेला होता. या घराबरोबरच इतरही स्फोटक माहिती एनआयएच्या हाती लागली आहे.
एनआयएच्या तपासामध्ये अमोनियम नायट्रेटबद्दलही माहिती मिळाली आहे. दहशतवाद्यांनी फतेहपूरमधील तगा आणि धौजमध्ये स्फोटके बनवण्याचे सामान लपवण्यापूर्वी विद्यापीठाजवळच ठेवले होते.
१२ दिवस शेतात ठेवले होते स्फोटके बनवण्याचे साहित्य
जवळपास २५४० किलो स्फोटके अल फलाह विद्यापीठाला लागून असलेल्या शेतात लपवले गेले होते. शेतात बनवलेल्या एका खोलीत हे साहित्य १२ दिवस ठेवले गेले होते. त्यानंतर ते चोरीला जाऊ नये किंवा गावात लोकांना कळू नये, या भीतीमुळे फतेहपूरमधील तगा येथील इश्तियाकच्या जुन्या घरी ते नेण्यात आले. हेच स्फोटके दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात आले.
सोमवारी रात्री एनआयएने डॉक्टर मुजम्मिलला येथील ठिकाणांवर नेले होते. येथील माजी सरपंचाने डॉक्टर मुजम्मिल पाहताच ओळखले.
८ हजार रुपयामध्ये भाड्याने घेतला होता फ्लॅट
माजी सरपंचाकडून मुजम्मिलने ८ हजार रुपये महिना इतक्या दराने तीन बेडरुम असलेले घर भाड्याने घेतले होते. एनआयएच्या तपासातून असेही समोर आले की, डॉक्टर मुजम्मिल शकीलने एप्रिल पासून ते जुलै २०२५ पर्यंत अल फलाह विद्यापीठापासून ४ किमी अंतरावर आणखी एक घर भाड्याने घेतले होते.
भाड्याने घेतलेले दुसरे घर खोरी जमालपूर येथील माजी सरपंच जु्म्मा यांचे आहे. जुम्मा यांची रस्त्याला लागून प्लॉस्टिक रॉ मटेरियल फॅक्ट्री आहे. त्याच्या वरच्या मजल्यावर खोल्या बनवण्यात आलेल्या आहेत. फळांचा व्यापार करायचा आहे, असे सांगून हे घर घेतले होते.
काश्मिरी फळांचा व्यापार करायची इच्छा आहे...
माजी सरपंच जुम्मा यांनी तपास यंत्रणांना सांगितले की, मुजम्मिलने इथे काश्मिरी फळांचा व्यापार करायचा आहे. त्यासाठी जास्त जागेची गरज आहे. काश्मीरमधून फळे मागवणार आणि ते येथील बाजारामध्ये विकणार. पण, अडीच महिन्यातच त्याने हे घर सोडले. घर सोडताना तो म्हणाला की, इथे गरमी खूप आहे.
जुम्माची मुजम्मिलसोबत भेट कशी झाली होती?
जुम्मा यांचा भाचा आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच जुम्मा यांची मुजम्मिल आणि उमर या दोघांशी ओळख झाली होती. एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, जुम्मा हे मुजम्मिलला आधीपासून ओळखत नव्हते. त्यांच्या भाच्याला कर्करोग झाला होता. त्या अल फलाह रुग्णालयात नेण्यात आले होते.
रुग्णालयात त्यांची ओळख मुजम्मिलसोबत झाली होती. त्यानंतर उमर नबीसोबत भेट झाली. भाच्यावरील उपचार सुरू असण्याच्या काळात त्यांच्या भेटी वाढल्या आणि ओळख घट्ट झाली होती. जुलै महिन्यात जुम्मा यांच्या भाच्याचा मृत्यू झाला. जुम्मा यांनी सांगितले की, मुजम्मिल अनेक वेळा माझ्या कार्यालयातही येऊन गेला होता.
मुजम्मिल शाहीन शाहीद सोबत यायचा
जुम्मा यांनी तपास यंत्रणांना अशी माहिती दिली की, मुजम्मिल घर भाड्याने घेतल्यानंतर एका महिलेसोबत अनेक वेळा इथे येऊन गेला. तपास यंत्रणांनी त्या महिलेचा स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला. त्यात ती महिला अटकेत असलेली डॉक्टर शाहीन शाहीद असल्याचे स्पष्ट झाले.
शाहीन शाहीद कुटुंबाची सदस्य असल्याचे त्याने जुम्मा यांना सांगितले होते. अनेक वेळा ते दोघे या घरात येऊन गेले. घर भाड्याने घेतल्यानंतर तीन महिन्यातच त्यांनी ते खाली केले. मुजम्मिल हा डॉक्टर असल्याने जुम्मा यांनी त्याच्याकडून जास्तीच्या १५ दिवसांचे भाडेही घेतले नाही.
मुजम्मिलने अल फलाह विद्यापीठाला लागून असलेल्या शेतात स्फोटके लपवली होती. ते शेत बदरू नावाच्या शेतकऱ्याचे असल्याची माहिती मिळाली आहे. याच शेतात अमोनियम नायट्रेटचे कट्टे ठेवण्यात आले होते. मशिदीला लागूनच शेत असल्याने बदरू तिथे नमाज पठण करायला जायचा. तिथे मुजम्मिल त्यांना भेटला होता. त्याने विश्वास संपादन केला आणि रसायने शेतात ठेवू देण्याची विनंती केली होती. यासाठी मुजम्मिलला इमाम इश्तियाकने मदत केल्याचेही आता उघड झाले आहे.
१२ दिवस स्फोटके शेतातील खोलीत होते. हे सामान चोरीला जाऊ शकते असे सांगून बदरूने त्याला घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर मुजम्मिलने ही स्फोटक इश्तियाक यांच्या फतेहपूरमधील तगा येथे असलेल्या जुन्या घरात नेऊन ठेवली होती.