Coronavirus News: एकाच दिवसात ३८,९०२ नवे रुग्ण; देशातील रुग्ण १० लाख ७७ हजारांवर; ७ लाख ७७ हजार बरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 06:21 IST2020-07-19T23:00:11+5:302020-07-20T06:21:29+5:30
केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, रविवारी २३, ६७२ रुग्ण कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

Coronavirus News: एकाच दिवसात ३८,९०२ नवे रुग्ण; देशातील रुग्ण १० लाख ७७ हजारांवर; ७ लाख ७७ हजार बरे
नवी दिल्ली : देशात रविवारी एकाच दिवसात कोरोनाचे ३८,९०२ नवे रुग्ण आढळून आले असून ही आजवरची सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १०,७७,६१८ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या संसगार्तून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्या ६,७७,४२२ झाली असून ती दिलासादायक घटना आहे. या आजारामुळे आणखी ५४३ जण मरण पावले असून त्यामुळे बळींची एकूण संख्या २६,८१६ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, रविवारी २३, ६७२ रुग्ण कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. सध्या देशामध्ये ३,७३,३७९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सलग चौथ्या दिवशी ३० हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी आणखी ३,५८,१२७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे त्या दिवसअखेर देशातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या १,३७,९१,८६९ इतकी झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांपैकी पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६२.८२ टक्के आहे.
कोरोना रुग्णांना लवकर शोधून काढणे व संसर्ग झालेल्यांचे प्राण वाचविणे या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या व बळी महाराष्ट्रात आहेत. देशातील बळींची एकूण संख्या २६,८१६ झाली असून त्यात महाराष्ट्रातील ११,५९६ बळींचा समावेश आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ३,००९३७ इतके रुग्ण असून, त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये १,६५,७१४, दिल्लीत १,२१,५८२, कर्नाटक ५९,६५२, गुजरात ४७,३९० कोरोनाचे रुग्ण आहेत.
देशांतील एकत्रित रुग्णसंख्या भारतापेक्षा आठपट जास्त
अमेरिका, ब्राझिल, रशिया, पेरु, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, इराण, पाकिस्तान, स्पेन, चिली या अकरा देशांमधील रुग्णांची संख्या एकत्रित केली तर ती भारतातील रुग्णसंख्येपेक्षा आठपट जास्त व या देशांतील एकत्रित मृत्यूदर भारतापेक्षा १४ पटीने अधिक आहे.