नवी दिल्ली - मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. या निवडणुकीत अंदाजे १.३५ लाख कोटी खर्च झालेत. सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या एका रिपोर्टमध्येही अंदाज वर्तवण्यात आला आहे. निवडणूक आयोगानेही अधिकृतपणे आकडे जारी केलेत. निवडणूक आयोगाने पक्षांकडून निवडणुकीत केलेला खर्च आणि आंध्र प्रदेश, ओडिशा, अरूणाचल प्रदेश, सिक्किम विधानसभेत झालेल्या खर्चाचा खुलासा केला आहे.
काही पक्षांनी त्यांचा हिशोब दिला आहे परंतु असेही काही पक्ष आहेत ज्यांनी अद्याप किती पैसे खर्च केले हे सांगितले नाही. कॉमनवेल्थ ह्यूमन राइट्स इनेशिएटिव्हने एक रिपोर्ट जारी केला आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीत किती पैसे खर्च केले, ते कुठून जमवले हे या रिपोर्टमध्ये सांगितले आहे. हा रिपोर्ट निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीच्या आधारे बनवण्यात आला आहे.
या पक्षांची नावे समाविष्ट
या रिपोर्टनुसार, २२ राजकीय पक्षांकडे निवडणूक लढण्यासाठी १८ हजार ७४२ कोटी होते. त्यात आम आदमी पार्टी, आसम गण परिषद, ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कडगम, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट, बीजू जनता दल, भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्र समिती, बहुजन समाज पार्टी, कम्युनिस्ट ऑफ इंडिया(मार्क्सवादी) सीपीआय(एम), द्रविड मुनेत्र कडगम, इंडियन नॅशनल काँग्रेस, जनता दल सेक्युलर, जनता दल युनाइटेड, लोक जनशक्ती पार्टी, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट, सिक्किम क्रांतीकारी मोर्चा, तेलुगु देशम पार्टी, युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टीचा समावेश आहे.
भाजपाने केला सर्वाधिक खर्च
या सर्व राजकीय पक्षांनी मिळून ३ हजार ८६१ कोटी ५७ लाख खर्च केलेत. त्यात भाजपाने सर्वाधिक १,७३७.६८ कोटी खर्च केलेत. एकूण खर्चाच्या ४५ टक्क्याहून जास्त हा खर्च आहे. पक्षाला देणगी म्हणून मिळालेले पैसे ७,४१६.३१ कोटी रूपये आहेत. भाजपाला त्यात ८४.५ टक्के वाटा मिळाला आहे. याचा अर्थ भाजपाला सर्वाधिक देणगी मिळाली आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेसचं CHRI डायरेक्टर व्यंकटेश नायक यांच्या हवाल्याने ही बातमी दिली. माध्यमांच्या जाहिरातीवर ९९२.४८ कोटी खर्च केलेत. स्टार प्रचारकांच्या दौऱ्यावर ८३०.१५ कोटी खर्च झालेत. हेलिकॉप्टर, प्रायव्हेट जेटचा वापर करण्यात आला. बॅनर, पोस्टर, होर्डिंग्सवर ३९८.४९ कोटी रूपये खर्च झालेत.
शिल्लक पैसा कुठे आहे?
निवडणुकीनंतर पक्षांकडे १४ हजार ८४८ कोटी शिल्लक आहेत. हा पैसा कुठे आहे याचे उत्तर अद्याप मिळाले नाही. भाजपासह ६ पक्षांकडे निवडणुकीपूर्वीच अधिक पैसे होते. काही मोठ्या पक्षांनी जसं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, झारखंड मुक्ति मोर्चा, शिवसेना, शिरोमणी अकाली दल यांनी त्यांच्या खर्चाचा खुलासा केला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च झालेल्या पैशामुळे भारत केवळ लोकशाही देश नाही तर आर्थिक रणांगण बनलं आहे. नेते कोट्यवधी रूपये खर्च करतात परंतु हा पैसा कुठून येतो, त्याचा फायदा कुणाला होतो हा विचार मतदारांना पडला आहे असं व्यंकटेश नायक यांनी म्हटलं.