३५ मंत्री घेणार मोदींसोबत शपथ

By Admin | Updated: May 25, 2014 05:32 IST2014-05-25T05:21:14+5:302014-05-25T05:32:05+5:30

पंतप्रधानपदाची सोमवारी शपथ घेणार असलेले नरेंद्र मोदी यांचे ५६ जणांचे मंत्रिमंडळ तयार झाले आहे.

35 Minister sworn in with oath to minister | ३५ मंत्री घेणार मोदींसोबत शपथ

३५ मंत्री घेणार मोदींसोबत शपथ

यदु जोशी/गजानन जानभोर, नवी दिल्ली - पंतप्रधानपदाची सोमवारी शपथ घेणार असलेले नरेंद्र मोदी यांचे ५६ जणांचे मंत्रिमंडळ तयार झाले आहे. त्यातील ३५ ते ४० मंत्री त्यांच्यासोबतच शपथ घेतील. त्यात कॅबिनेट व राज्यमंत्र्यांचाही समावेश असेल. उर्वरित मंत्र्यांची विस्तारामध्ये वर्णी लागेल. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातून भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, हंसराज अहीर, रावसाहेब दानवे, पीयूष गोयल यांचा समावेश जवळपास नक्की आहे. दिलीप गांधी किंवा हरिश्चंद्र चव्हाण यांच्यापैकी एकाची वा शेवटच्या क्षणी दोघांनाही मंत्रिपद मिळू शकते, असे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. सूत्रांनी असेही सांगितले की, गृहमंत्री पद भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांना तर वित्त मंत्रिपद ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना देण्यात येणार आहे. मावळत्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्याकडे संरक्षण किंवा परराष्ट्र मंत्रिपद राहील. माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे पायाभूत सुविधा आणि भूपृष्ठ वाहतूक असे एकत्रित खाते राहील, हे जवळपास निश्चित झाले आहे. याशिवाय, रेल्वे-वेंकय्या नायडू, कायदा - रविशंकर प्रसाद, आरोग्य - डॉ. हर्षवर्धन (पान १ वरुन ) अशी खातीही ठरल्याची माहिती मिळते. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी डॉ. मुरली मनोहर जोशी हे नव्या सरकारमध्ये मंत्री नसतील. ते मार्गदर्शकाची भूमिका निभावतील आणि सरकार तसेच पक्ष चालविताना सातत्याने त्यांचा सल्ला घेतला जाईल, असे माहितगार सूत्रांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशिरापर्यंत बैठक होऊन मंत्रिमंडळाचे स्वरुप निश्चित करण्यात आले. प्रख्यात बँकर दीपक पारेख, ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी आणि रेल्वेचे तज्अ ई. श्रीधरन या मान्यवरांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी चर्चा जोरात होती पण त्यांचा समावेश होणार नाही. तज्ज्ञाच्या मागे न लागता भाजपात सक्रिय असलेल्या नेत्यांनाच संधी द्यायची असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ६० खाती एकत्र करून त्याची २० खाती तयार केली जाणार आहेत. एका कॅबिनेट मंत्र्याच्या हाताखाली चार राज्यमंत्री असतील. मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक २७ मे रोजी होणार आहे.

Web Title: 35 Minister sworn in with oath to minister