नाशकात कशापायी होतेय शिवसेनेची लुटुपुटुची लढाई?

By किरण अग्रवाल | Published: March 8, 2020 12:29 AM2020-03-08T00:29:49+5:302020-03-08T00:42:02+5:30

नाशकात महापौरां-पाठोपाठ स्थायी समिती सभापतीही बिनविरोध निवडले गेल्याचे पाहता, महापालिकेत विरोधी पक्ष उरलाय की नाही, अशीच शंका घेता यावी. यात होणाºया सहयोगाच्या राजकारणामुळे शिवसेनेत अंतर्गत खदखद वाढल्याने पक्ष पदाधिकारी अयोध्येतील ‘रामायण’ आटोपून आल्यावर पक्षांतर्गत ‘महाभारत’ घडल्यास आश्चर्य वाटू नये.

What was happening in Nashik? Shiv Sena's plunder battle? | नाशकात कशापायी होतेय शिवसेनेची लुटुपुटुची लढाई?

नाशकात कशापायी होतेय शिवसेनेची लुटुपुटुची लढाई?

googlenewsNext
ठळक मुद्देइशाऱ्यावर इशारे व आपल्या स्टाइलच्या केल्या जातात वल्गना; प्रत्यक्षात मात्र घेतली जाते सत्ताधाऱ्यांना सोयीची भूमिकालोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची आक्रमकता या पक्षाने राज्यात दाखवून दिली आहे.

सारांश

आक्रमकता हा शिवसेनेचा स्थायिभाव राहिला आहे. त्यामुळे बोलून दाखविण्यापेक्षा करून दाखविण्यावर या पक्ष-संघटनेत भर दिसून येतो. प्रश्नांची मांडणी असो, की सोडवणूक; प्रत्येकच बाबतीत या संघटनेतील सैनिकांकडून तशा स्वभावाची प्रचिती येते. तीच त्यांची व परिणामी पक्षाचीही ओळख बनून गेली आहे. परंतु यापेक्षा विपरीत वर्तनाचा अनुभव त्यांच्याच सहोदरांना येतो तेव्हा शंकांचे ढग दाटून आल्याखेरीज राहात नाहीत. नाशिक महापालिकेत प्रबळ विरोधी पक्षाच्या भूमिकेत असतानाही शिवसेनेकडून ज्या पद्धतीने सत्ताधारीपूरक राजकारण केले जाताना दिसून येते आहे, ते त्यामुळेच अचंबित करणारे ठरले आहे.

नाशिक महापालिकेशी संबंधित कामकाजाच्या अनेक तक्रारी व प्रभाग समित्यांच्या सभेत नगरसेवकच विविध आंदोलनांच्या पवित्र्यात दिसत असतानाही पालिकेतील विरोधी पक्ष शिवसेनेकडून त्याबाबत सत्ताधारी किंवा प्रशासनाला धारेवर धरले जात नाही, अशी खुद्द या पक्षातीलच काही प्रतिनिधींची व कार्यकर्त्यांची सुप्त तक्रार आहे. खरे तर सत्तेत असूनही लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची आक्रमकता या पक्षाने राज्यात दाखवून दिली आहे. नाशिक महापालिकेत मात्र विरोधी पक्ष असूनही तसे होताना दिसत नाही. उलट कारणे काहीही दिली जावोत, अगर पळवाटा दाखविल्या जावोत; पण सत्ताधारी भाजपस सोयीची ठरणारी भूमिकाच शिवसेनेकडून घेतली जात असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे सांगून त्या प्रक्रियेपासून दूर राहण्याच्या या पक्षाच्या भूमिकेने यासंबंधीच्या चर्चा व शंकांनाही तोंड फुटणे स्वाभाविक ठरून गेले आहे.

मुळात गेल्या महापौर निवडणुकीप्रसंगीही ऐनवेळी शिवसेनेने तटस्थतेची भूमिका स्वीकारून भाजपला बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा करून दिला होता, त्यावेळीही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेषत: राज्याच्या राजकारणात शिवसेना व भाजपत जे सत्तानाट्य घडून आले होते त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या महापौर निवडीतही चमत्कार घडविले जाण्याच्या वल्गना केल्या गेल्या होत्या. आमदारकीसाठी भाजपच्या तिकिटापासून वंचित राहावे लागल्याने व राष्ट्रवादीकडून लढूनही पराभूत होऊन शिवसेनेच्या आश्रयाला गेलेल्या स्वयंभू नेत्यामुळे तर चमत्कार घडणारच, असे छातीठोकपणे सांगितले जात होते. पण ऐनवेळी सारे गणितच फिरले. तद्नंतर स्थायी समितीवरील निवडी होताना शिवसेनेने ज्या दोन ज्येष्ठांना संधी दिली त्यांच्या नावाबद्दल पक्षातूनच नाराजीचे सुरू उमटलेले दिसून आले. तीच ती नावे वगळता दुसºयांना संधीच देणार नाही का, असा सवाल शिवसेनेच्याच एका नगरसेविकेच्या पतीने केला. अर्थात, अशातही या दोघांपैकी एकाची गणिते जुळविण्याबद्दलची ख्याती पाहता भाजपच्या उमेदवाराशी चांगली टक्कर होईल अशी अपेक्षा बाळगली गेली होती; पण तीही फोल ठरली. त्यामुळेही शिवसेना पदाधिकाºयांच्या एकूणच भूमिकेबद्दल संशयाचे लोळ उठणे क्रमप्राप्त ठरले.

महत्त्वाचे म्हणजे, राज्यात आघाडी सरकार गतिमानपणे काम करीत असल्याने त्यांच्या पाठबळावर नाशिक महापालिकेत आघाडीतील पक्षांना ‘एकी’ने वेगळा दबदबा निर्माण करता येणे अवघड वा अशक्य नाही. पण त्याऐवजी साºयांच्या ‘मिलीजुली’चे चित्र समोर येताना दिसते. म्हणायला, विरोधक म्हणून इशारे दिले जातात; शिवसेना स्टाइल धडा शिकवला जाईल, असे म्हटले जाते; परंतु पुढे काहीच होताना दिसत नाही. वेळ निभावून गेली की सारे एका ‘एसटी’तील प्रवासी असल्यासारखे गुण्यागोविंदाने पुढील प्रवास करताना दिसतात. बससेवेच्या ठेक्याचा विषय असो, की सेंट्रल किचनच्या ठेक्याचा, इशारे कुठे व का विरले हे कळलेच नाही. सत्ताधाºयांशी अशी लुटुपुटुची लढाई का, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित झाला आहे.

पदांवर कुणीही असले तरी पक्ष आणि महापालिकेतील कामकाजही मोजकीच मंडळी चालवित असल्याचे आरोप शिवसेनेत नवे राहिले नाहीत. अलीकडेच एका पदाधिकाºयाने यावर तोंड उघडले. पक्षाचे कार्य प्रमुखांचे नाव घेऊन मनमानी केली जात असल्याचा आरोप या पदाधिकाºयाने करताच त्याची उचलबांगडी केली गेली व स्थायी सदस्यत्वासाठी नाराजी बोलून दाखविणाºयाची तेथे नेमणूक करून शांती घडविली गेली. पालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती व अन्यही पदांवरील व्यक्ती बदलल्या; परंतु शिवसेनेचे गटनेते व विरोधी पक्ष नेते तेच आहेत हादेखील चर्चेचा मुद्दा होऊ पाहतो आहे. नसत्या शंकांना जन्म मिळतो आहे तो त्यामुळेच.

Web Title: What was happening in Nashik? Shiv Sena's plunder battle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.