What should be against the Bhujbal resistance of the local Shiv Senais? | स्थानिक शिवसैनिकांच्या भुजबळ विरोधामागे काय असावे?
स्थानिक शिवसैनिकांच्या भुजबळ विरोधामागे काय असावे?

ठळक मुद्दे राजकारणात नेहमीच चहापेक्षा किटली गरम ही उत्स्फूर्तता स्थानिकांची, की भुजबळांमुळे आपले स्थान धोक्यात येण्याची भीती सतावणाऱ्या दूरस्थांची?‘साहेबांना, म्हणजे शिवसेनाप्रमुखांना दिलेला त्रास महाराष्ट्र विसरू शकत नाही’,

सारांश

दोन मोठ्यांच्या बोलण्यात तिस-या छोट्यांनी नाक खुपसू नये, असे नेहमी बोलले जाते; पण राजकारणात नेहमीच चहापेक्षा किटली गरम राहात असल्याने ओसरीचा अंदाज न घेता पाय पसरणारे आढळूून येतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत झडत असलेल्या चर्चांच्या अनुषंगाने नाशकातून त्यांना होत असलेला विरोधही त्यातूनच होत असावा, अन्यथा भुजबळांच्या स्वगृही असे घडणे अपेक्षिता येऊ नये.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय धुमशानला प्रारंभ होऊन गेला आहे. मध्यंतरीच्या पूरपाण्यामुळे कोल्हापूर, सांगलीतील परिस्थिती खूपच बिकट झाल्याने राजकीय थंडावा ओढवला होता; परंतु तिकडची दैनावस्था ओसरली नसली तरी इकडे राजकीय माहौल तापू लागला आहे. राजकीय संधिसाधूंची भरती-ओहोटीही जोरात सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार धनराज महाले, कल्याणराव पाटील यांच्या ‘घरवापसी’ पाठोपाठ आमदार सौ. निर्मला गावित व रामदास चारोस्कर हेही शिवबंधनात अडकले आहेत. अजून अनेकजण सत्ताधारी पक्षांच्या वाटेवर असल्याची चर्चा असून, त्यात मातब्बर नेते छगन भुजबळ यांचेही नाव घेतले जात आहे. अर्थात, यासंबंधीच्या चर्चा खोडून काढत, ‘तिकडे जाणारे भुजबळ दुसरे कुणी असतील’ म्हणून खुद्द छगन भुजबळ यांनी स्पष्टता केली आहे, तर त्यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांनीही या वार्तांना अफवा ठरविले आहे, तरी नाशिकचे काही शिवसैनिक ‘मातोश्री’वरही विरोध नोंदवायला गेले म्हणे. त्यामुळे राजकीय उष्मा वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे.
मुळात, या चर्चेतील खरे-खोटेपण अजून सिद्ध व्हायचे आहे. ते यथावकाश होईलही, आणि त्यासाठी दोन्ही संबंधित निर्णयकर्ते सक्षम आहेत. परंतु त्यांनी काही निर्णय घेण्याच्या आत इतरच आपले विरोधाचे फलक झळकवताना दिसत असल्याने त्याबाबतची कारणमीमांसा उलगडणे गरजेचे ठरावे. बरे, ज्यावेळी मुंबईत सचिन अहिर शिवसेनेत गेले त्यावेळीही भुजबळांच्या नावाची चर्चा झाली होती. म्हणूनच मुंबईत त्यांच्या प्रवेशाला विरोध करणारे पोस्टर्स झळकले होते. त्याच मजकुराचे, तसेच पोस्टर्स नाशकात लागले व नंतर लगेचच काढलेही गेलेत. त्यामुळे भुजबळांच्या गृहकुलात असा विरोध होण्यामागचे कारण जाणून घेणे औत्सुक्याचे ठरले आहे. ‘साहेबांना, म्हणजे शिवसेनाप्रमुखांना दिलेला त्रास महाराष्ट्र विसरू शकत नाही’, असा मजकूर त्या पोस्टर्सवर लिहून हा विरोध नोंदविला गेला. तेव्हा, जो त्रास महाराष्ट्र विसरू शकत नाही तो खुद्द पक्षाचे कार्यप्रमुख विसरून जर निर्णय घेणार असतील तर त्याला मावळ्यांनी विरोध करूनही काय उपयोग?
महत्त्वाचे म्हणजे, भुजबळ शिवसेनेत होते तेव्हाचा तो काळ अजूनही अनेकांच्या स्मरणात असावा. मुंबईहून येणाºया भुजबळांच्या स्वागतासाठी मुंबई नाक्यावर होणारी गर्दी अनेकांनी पाहिली आहे. त्यावेळचे अनेक शिवसैनिक जे आज नेते बनले आहेत, त्यातील काही जण खासगीत भुजबळांच्या संपर्कात व आशीर्वादात कायम आहेत हे लपून राहिलेले नाही. बरे, भुजबळांचे एकूणच राजकीय कर्तृत्व व उंची पाहता त्यांच्याशी स्पर्धा होईल व ते इकडे आल्याने आपले नुकसान होईल, अशी भीती बाळगण्यासारखेही स्थानिक पातळीवर कुणी नाही. उलट आज नेतृत्वाअभावी सैरभर झालेल्या पक्ष-संघटनेला बाहुबली आधारच त्यांच्या निमित्ताने लाभू शकतो. पण, तसा विचार न करता नाशकातूनही विरोध सुरू झालेला दिसत आहे.
जुन्या जखमांचे व्रण मनावर कोरून असलेल्या स्थानिक निष्ठावंतांचे हे पाऊल असेल तर एकवेळ समजूनही घेता यावे. पण, भुजबळांच्या येण्याने मागे पडण्याची धास्ती बाळगणाºया पक्षातील दूरस्थ नेत्यांच्या सांगाव्यातून असे घडले असेल तर ती नसती उठाठेव म्हणूनच त्याकडे पाहता यावे. कारण, राजकारणातले कोणतेच व्रण सदासर्वकाळ टिकत नसतात हा आजवरचा अनुभव आहे. व्रणाचे काय घेऊन बसलात, प्रेमाचे संबंधही चिरकाल नसतात. अन्यथा गेल्यावेळी ‘युती’ तुटलीच नसती. तेव्हा, यंदा काय होईल, न होईल हा नंतरचा विषय; शिवाय कुणालाही पक्षप्रवेश देणे न देणे हा पक्ष नेतृत्वाच्या अखत्यारीतील विषय असताना स्थानिक पातळीवरील इवल्याशा तोंडांनी नगारे वाजवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येणे, याकडे पक्षांतर्गत लोकशाही म्हणून भलेही पाहता यावे; पण एकचालकानुवर्तीत्वाची प्रथा असणाºया शिवसेनेत अशा प्रयत्नांची पत्रास काय बाळगली जाणार, हाही प्रश्नच ठरावा. योग्य वेळी योग्य निर्णयाची भाषा त्यादृष्टीने महत्त्वाची ठरावी़

Web Title:  What should be against the Bhujbal resistance of the local Shiv Senais?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.