प्रवाशांची प्रतीक्षा

By Admin | Updated: April 9, 2017 00:38 IST2017-04-09T00:38:21+5:302017-04-09T00:38:57+5:30

नाशिक : गडावर भरणाऱ्या यात्रेसाठी महामंडळाने ४७ एस.टी. बसेसचे नियोजन केले असले तरी विद्यार्थ्यांच्या परीक्षेमुळे प्रवाशांनी यात्रेकडे पाठ फिरविली आहे.

Waiting for the passengers | प्रवाशांची प्रतीक्षा

प्रवाशांची प्रतीक्षा

नाशिक : चैत्रोत्सवानिमित्त श्री सप्तशृंग गडावर भरणाऱ्या यात्रेसाठी लाखो भाविक दाखल होण्याचा अंदाज लक्षात घेता, राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून दररोज ४७ एस.टी. बसेसचे नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात उन्हाळा व विद्यार्थ्यांच्या परीक्षेमुळे प्रवाशांनी यात्रेकडे पाठ फिरविली असून, जेमतेम प्रवासी घेऊन बस मार्गक्रमण करीत आहे.
चैत्र महिन्यात सप्तशृंगगडावर पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजराथ राज्यातूनही लाखो भाविक दाखल होत असतात. साधारणत: चार ते पाच लाख भाविक दरवर्षी गडाला भेट देत असल्याने त्यादृष्टीने राज्य परिवहन महामंडळाकडून एस.टी. बसचे नियोजन केले जाते. यंदाही लाखो भाविक येण्याचा अंदाज घेत एस.टी. महामंडळाने जिल्ह्यातून दररोज ४७ ते १२० बसेसचे नियोजन केले. त्यासाठी प्रत्येक आगारातून भाविकांची संख्या लक्षात घेता गाड्या सोडण्याच्या सूचना आगार प्रमुखांना असून, नाशिक शहरात जुने मध्यवर्ती बसस्थानक, पंचवटी डेपो क्रमांक दोन या ठिकाणाहून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दि. ४ पासून राज्य परिवहन महामंडळाने जादा बसेसचे नियोजन केले असले तरी, जुन्या बसस्थानकावरून पंधरा ते वीस इतक्याच बसेस दररोज धावू लागल्या आहेत. त्यातही पुरेसे प्रवासी नसतात. यंदा पहिल्यांदाच चैत्रोत्सवाला जाणाऱ्या भाविकांची संख्या रोडावल्याचे परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Waiting for the passengers