विकास खुंटला : माळेगावच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

By Admin | Updated: January 10, 2015 00:23 IST2015-01-10T00:23:12+5:302015-01-10T00:23:22+5:30

मोकळ्या भूखंडासाठी उद्योगमंत्र्यांना साकडे

Vikas Khuntla: The office bearers of Malegaon have taken a meeting | विकास खुंटला : माळेगावच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

विकास खुंटला : माळेगावच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

 सिन्नर : माळेगाव औद्योगिक क्षेत्र विकसित झाल्याने नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामपंचायत प्रशासनासमोर अनेक समस्या निर्माण होत असून, शाळा इमारत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व क्रीडांगण बांधकामाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार राजाभाऊ वाजे व माळेगावचे सरपंच तुकाराम सांगळे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन त्यांना एमआयडीसीकडून भूखंड उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे साकडे घातले.
माळेगाव औद्योगिक वसाहतीसोबत गावात लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात काही समस्या निर्माण होत आहेत. ग्रामपंचायत हद्दवगळता सर्व परिसरातील सर्व भूखंड एमआयडीसीच्या ताब्यात आहेत. सदर भूखंड मिळावेत यासाठी आमदार वाजे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती सदस्य उदय सांगळे, सरपंच तुकाराम सांगळे, ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यामुळे एमआयडीसीकडून भूखंड मिळावेत, अशी मागणी करण्यात आली. औद्योगिक वसाहतीमध्ये कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक करण्यासाठी मालट्रक येत असतात. यावरील चालकांना स्वच्छतागृहाची व पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. एमआयडीसीने वेगवेगळ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास ग्रामपंचायत स्वखर्चाने स्वच्छतागृह उभारू शकते, असे यावेळी सांगण्यात आले. माळेगाव - मापारवाडी ग्रामपंचायतीला १९९६ मध्ये ४० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली होती. माळेगावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, सदर जलवाहिनी मोठी होण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले. उद्योगमंत्री देसाई यांनी पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले. तर भूखंडाबाबत स्वतंत्र प्रस्ताव देण्याची मागणी केली. (वार्ताहर)

Web Title: Vikas Khuntla: The office bearers of Malegaon have taken a meeting