विजय मल्ल्यांचे कर्ज माफ केले

By Admin | Updated: November 19, 2016 00:05 IST2016-11-19T00:08:25+5:302016-11-19T00:05:00+5:30

आता माझेही करा,सफाई कामगाराचे स्टेट बॅँकेला साकडे

Vijay Mallya's debt was waived | विजय मल्ल्यांचे कर्ज माफ केले

विजय मल्ल्यांचे कर्ज माफ केले

नाशिक : भारतीय स्टेट बॅँकेने उद्योगपती विजय मल्ल्या यांचे १२०० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, मी एक गरीब माणूस असून, सफाई कामगार आहे. त्यामुळे माझेही कर्ज याच धोरणानुसार माफ करावे, अशी मागणी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत काम करणाऱ्या भाऊराव सीताराम सोनवणे या कर्मचाऱ्याने स्टेट बॅँकेच्या त्र्यंबकेश्वर शाखेकडे केली आहे.
देशातील सर्वात मोठी बॅँक असलेल्या स्टेट बॅँक आॅफ इंडियाने देशातील ६३ बड्या उद्योगपतींचे सात हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. त्यात विदेशात पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा समावेश असून, त्यांचे एक हजार २०१ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. लोकमतच्या या बातमीचा संदर्भ घेऊनच त्र्यंबकेश्वर येथील या सफाई कामगाराने स्टेट बॅँकेत हे पत्र दिले आहे.
भाऊराव सोनवणे याने आपल्या मुलाच्या आजारपणासाठी दीड लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. तीन वर्षे मुदतीचे हे कर्ज आहे. यासंदर्भात बॅँकेच्या शाखा व्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, भारतीय स्टेट बॅँक यांनी वैयक्तिक कर्ज उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतीय स्टेट बॅँकेचे असलेले १२०१ कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचे लोकमत वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे, ही बाब अत्यंत चांगली आहे. तरी मी आपणास विनंती करतो की, मी एक गरीब घरातील असून, नगर परिषदेत सफाई कामगार या पदावर काम करतो. ज्या अर्थी आपली बॅँक मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करते, त्याचप्रमाणे माझे दीड लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज त्याच धोरणानुसार माफ करावे, ही विनंती असे नमूद करण्यात आले आहे. सोशल मीडियावरून हे पत्र व्हायरल झाले असून, सरकारचा उद्योगपतींना कर्जमाफी देण्याचा निर्णय आता सामान्यांना लागू करावा अशी टिप्पणी त्यावर होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vijay Mallya's debt was waived