पीओपी मूर्ती विसर्जनाचा प्रयोग

By Admin | Updated: September 4, 2016 00:44 IST2016-09-04T00:43:48+5:302016-09-04T00:44:36+5:30

उपमहापौरांचा पुढाकार : अमोनियम बायकार्बोनेटचा वापर; नाशकातही राबविणार उपक्रम

Use of POP idols | पीओपी मूर्ती विसर्जनाचा प्रयोग

पीओपी मूर्ती विसर्जनाचा प्रयोग

नाशिक : प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पुणे महापालिकेमार्फत अमोनियम बायकार्बोनेटच्या माध्यमातून मूर्ती विसर्जनाचा राबविण्यात येणारा प्रयोग नाशिकमध्येही करण्यासाठी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी पुढाकार घेतला असून, त्यासंबंधी त्यांनी आयुक्तांना पत्र पाठविले आहे. संपूर्ण प्रयोग जाणून घेण्यासाठी महापालिकेचा अधिकारी पुणे येथे पाठविण्याची सूचना उपमहापौरांनी प्रशासनाला केली आहे.
पीओपीच्या मूर्ती या पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे जलप्रदूषणात वाढ होऊन जलचर प्राण्यांसह वनस्पतींनाही धोका पोहोचतो. त्यासाठीच पीओपीच्या मूर्तींचा वापर न करण्यासाठी सर्व स्तरातून जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी पीओपी ऐवजी पाण्यात लवकर विरघळणाऱ्या शाडूमातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहनही केले जात आहे. त्यासाठी अनेक शाळा-स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शाडू मातीपासून गणपती बनविण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, पीओपी मूर्तीपासून जलप्रदूषण रोखण्यासाठी पुणे महापालिकेने अभिनव प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. घरोघरच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी पुणे महापालिका नागरिकांना सोडा अर्थात अमोनियम बायकार्बोनेट हा पदार्थ मोफत उपलब्ध करून देणार आहे. सदर पदार्थ पाण्यात टाकल्यास त्यात पीओपी मूर्ती काही तासांमध्ये विरघळते. पुणे महापालिका आणि कमिन्स इंडिया कंपनी यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या सहकार्याने हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही असा उपक्रम राबविता येईल काय, यासाठी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी पुढाकार घेतला असून त्यासंबंधीचे पत्र आयुक्तांना पाठविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Use of POP idols