जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांमध्ये अस्वस्थता

By Admin | Updated: January 20, 2017 22:34 IST2017-01-20T22:33:38+5:302017-01-20T22:34:50+5:30

वणी : प्रतिकूल हवामानामुळे विपरीत परिणाम

Unrest among grape growers in the district | जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांमध्ये अस्वस्थता

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांमध्ये अस्वस्थता

वणी : असमतोलीत हवामानामुळे द्राक्षबागांवर प्रतिकूल परिणाम होत असून, द्राक्षातील ब्रिक्स म्हणजेच साखरेचे प्रमाण वाढण्यावर प्रभाव पडत असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. द्राक्षपंढरी म्हणून दिंडोरी तालुका परिचित असून, कसदार व पोषक जमीन पाण्याचे स्त्रोत यामुळे द्राक्ष लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. विविध जातीची द्राक्षे उत्पादनात तालुका अग्रेसर असून, नवनवीन अद्यावत तंत्राचा वापर करून परराज्यात तसेच परदेशात नावलौकिक प्राप्त केला आहे. मात्र सध्या द्राक्ष उत्पादकांना वेगळ्याच अस्मानी संकटाला सामोरे जावे लागते आहे. गत काही दिवसात थंडीचे प्रमाण वाढले होते. त्याबरोबर ढगाळ हवामानाने उत्पादकांच्या तोंडचे  पाणी पळाले होते. थंडीचे प्रमाण आता कमी झाले असले तरी ढगाळ हवामानाच्या समस्येने उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. अशा वातावरणात भुरी मिलीबग अशा रोगांना आमंत्रण मिळते तर द्राक्षातील साखरवाढीवर याचा प्रतिकूल परिणाम होतो.
सर्वसाधारण स्थितीत द्राक्षातील साखरेचे प्रमाण १८ टक्के किंवा त्यापुढे पाहिजे; मात्र आता १३ टक्के एवढेच प्रमाण काही भागात असल्याची माहिती काही उत्पादकांनी दिली. परप्रांतातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर द्राक्षखरेदीसाठी उत्सुक आहेत; मात्र प्रतिकूल वातावरणामुळे द्राक्षबागा पूर्णत: परिपक्व होण्यास अडचणी येत आहे. अपवादात्मक स्थितीत काही द्राक्षबागांची खुडणी सुरू आहे, मात्र दराबाबत घासाघीस करावी लागते आहे. दरम्यान, नोटबंदीच्या सुलतानी फटक्याच्या विळख्यात सर्वच उद्योगधंदे सापडल्याचे चित्र दिसते आहे. त्यात शेतीव्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे जाणवत असताना द्राक्ष उत्पादक आता सुलतानीबरोबर अस्मानी संकटात सापडला आहे. (वार्ताहर)

Web Title: Unrest among grape growers in the district