Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 19:48 IST2026-01-07T19:47:58+5:302026-01-07T19:48:41+5:30
Nashik-Peth Highway Accident: नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावरील आंबेगन शिवारात आज दुपारी एक भीषण अपघात घडला, ज्यात चार जण जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावरील आंबेगन शिवारात आज दुपारी एक भीषण अपघात घडला. दोन कारची समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या वापी येथील काही भाविक शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन आपल्या कारने नाशिकमार्गे परतत होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चाचडगाव टोलनाका ओलांडल्यानंतर आंबेगन शिवारात त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारशी भीषण धडक झाली.
या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातातील सहा जखमी महिलांना तात्काळ नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी चार महिलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही वाहने एकमेकांत अडकल्यामुळे प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून रस्ता मोकळा केला आहे.