बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:01 IST2025-11-28T16:59:22+5:302025-11-28T17:01:50+5:30
तीन वर्षांचा एक चिमुकला खाली कोसळतानाच्या घटनेचा व्हिडिओ गुरुवारी (२७ नोव्हेंबर) सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या व्हिडीओतील घटनेची माहितीही समोर आली आहे.

बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
Nashik Latest News: एका अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून डोकावताना चिमुकला खाली कोसळतानाच्या घटनेचा व्हिडिओ गुरुवारी (२७ नोव्हेंबर) सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओतील घटनेची माहिती पडताळली असता ती शनिवारी (२२ नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास घडलेली आहे. यामध्ये दैव बलवत्तर असल्यामुळे तीन वर्षाचा मुलगा बालंबाल बचावला. त्याच्या हातापायांना दुखापत झाली असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट झाले.
गंगापूर रोड परिसरातील निर्मला कॉन्व्हेंट शाळेपासून पुढे असलेल्या दत्त मंदिराजवळच्या सहदेवनगरात सुमित पॅलेस अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर भाडेतत्त्वावर शिंदे कुटुंबीय वास्तव्यास आहे.
त्यांचा तीन वर्षाचा चिमुकला श्रीराज हा शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास खेळताना बाल्कनीत आला. तो यावेळी बाहेरच्या परिसरात डोकावण्याच्या प्रयत्नात असताना अचानकपणे त्याचा तोल गेला अन् तो खाली अपार्टमेंटच्या आतमधील बाजूस कोसळला.
मोठा अनर्थ टळला
सुदैवाने संरक्षक भिंतीचा मार त्याला बसला नाही, यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ही बाब लक्षात येताच त्याच्या कुटुंबियांनी तातडीने त्यास जुना आडगावनाका येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्याच्या हाताला फॅक्चर झाले असून, शरीराच्या अन्य भागालाही दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती स्थिर असून, धोक्याबाहेर असल्याचे अपार्टमेंटच्या अध्यक्षांनी सांगितले. या घटनेने परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले होते.