एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 16:13 IST2025-09-15T16:12:01+5:302025-09-15T16:13:05+5:30
Couple ends life in Nashik: ते दोघे गावातून आले. नाशिकमध्ये भेटले. सोबत वेळ घालवला आणि त्यानंतर रेल्वेसमोर उड्या मारल्या. सोबत आयुष्य जगण्याच्या स्वप्नांचा शेवट झाला.

एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
Nashik crime: नाशिकरोड जेलरोड भागातील पवारवाडी येथे शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास डाऊन लाइनवरून सुसाट धावणाऱ्या मुंबई-हावडा एक्स्प्रेससमोर एका प्रेमीयुगुलाने उडी घेत जीवन प्रवास संपविल्याची धक्कादायक घटना घडली. युवक युवतीच्या मृतदेहांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. याप्रकरणी शनिवारी (दि. १३) दुपारी चार वाजता नाशिकरोडपोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
पवारवाडीजवळील रेल्वे किमीच्या १९०/२७-२९ पोलदरम्यान शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुंबई हावडा एक्स्प्रेसपुढे (क्र. १२३२२) प्रेमीयुगुलाने येऊन मृत्यूला कवटाळले. हावडाचे प्रबंधक मनोजकुमार यांनी तातडीने या घटनेची माहिती नाशिकरोड रेल्वे स्थानक उपप्रबंधक कार्यालयाला कळविली. रेल्वे व नाशिकरोड पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
मयत तरुण हा अंदाजे तीस वर्षाचा असून, शरीरयष्टी सडपातळ आहे. तसेच तरुणीदेखील २५ ते २८ वयोगटातील असल्याचे नाशिकरोड पोलिसांनी सांगितले.
तरुण-तरुणी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील
हे प्रेमीयुगुल त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रहिवासी असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी मध्यरात्री या दोघांनी आत्महत्या केली आहे. मात्र, रविवारी सायंकाळपर्यंत त्यांची ओळख पटू शकलेली नव्हती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुका पोलिसांशीही संपर्क साधला असून, बेपत्ता युवक युवतींची माहिती मागविल्याचे समजते.
सिटीलिंक बसच्या तिकिटावरून तपास
पंचनाम्यादरम्यान युवकाच्या पॅन्टच्या खिशात सिटीलिंक बसचे तिकीट सापडले. त्यावरील तपशिलावरून या दोघांनी शुक्रवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेजे फाटा येथून बसमधून प्रवास सुरू केला.
शहरातील रविवार कारंजा येथे आले. तेथून नांदूर नाकामार्गे - नाशिकरोडकडे जाणाऱ्या बसने पुढचा प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी बसचालक व वाहक यांच्याकडे जेलरोड पवारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची चौकशीसुद्धा केली. रात्री जेलरोडवरील सैलानी बाबा चौकात ते दोघे उतरले. तेथून पवारवाडीजवळ रेल्वेमार्ग गाठला.