हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 06:58 IST2025-07-20T06:58:34+5:302025-07-20T06:58:47+5:30
काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत असून, नाशिकमधील एका अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचे नावदेखील यात घेतले जात आहे.

हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
नाशिक/जळगाव : काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत असून, नाशिकमधील एका अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचे नावदेखील यात घेतले जात आहे. काँग्रेसच्या एका माजी स्थानिक पदाधिकाऱ्याच्या हॉटेलची तपासणी विशेष चौकशी पथकामार्फत शनिवारी (दि. १९) केली गेल्याचे वृत्त आहे.
हनी ट्रॅपप्रकरणी मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार जामनेर व पहुर येथील प्रफुल्ल रायचंद लोढा हे साकीनाका येथे अटकेत आहेत.
नाशिकच्या बहुचर्चित हनी ट्रॅपमध्ये सुमारे ७२ अधिकारी आणि नेते अडकल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यासंदर्भात विषय उपस्थित केला आणि पेनड्राइव्ह देखील सादर केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हनीही नाही आणि ट्रॅपही नाही, असे सांगत विषय फेटाळून लावला. त्यानंतरही शनिवारी पटोले आपल्या आरोपावर ठाम होते.
जळगाव जिल्ह्यातही हनी ट्रॅप प्रकरण समोर आले असून यामध्ये जामनेरच्या पहूर येथील मूळ निवासी प्रफुल्ल रायचंद लोढा यांच्याविरुद्ध ३ जुलै रोजी साकीनाका पोलिस ठाण्यात पोस्को, बलात्कार, खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, तर १४ जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोस्कोअंतर्गत बलात्कार, हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला.
साकीनाका पोलिसांनी लोढा यांना ५ जुलै रोजी अटक केली आहे. या प्रकरणी जळगावसह जामनेर आणि पोहूर येथील लोढा यांच्या मालमत्तांची तपासणी करून संबंधित काहीजणांचे इन कॅमेरा जबाब नोंदवले आहेत. तसेच दुकाने खरेदी-विक्री व भाड्याने देण्याची चौकशी केली. या चौकशी दरम्यान, एक लॅपटॉप, दोन पेन ड्राईव्ह व काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्याचीही माहिती आहे. लोढा हे पूर्वाश्रमीचे आरोग्य दूत म्हणून ओळखले जात. लोढा हे एका मातब्बर नेत्याचे निकटवर्तीय होते. दरम्यान, या प्रकरणी एका विशेष पथकाने नाशिकमध्ये येऊन चौकशी केल्याचे सांगण्यात येते.
हॉटेलमध्ये तपासणी केल्याची चर्चा
पथकाने चर्चेतील त्या हॉटेलमध्ये जाऊन तपासणी १ केल्याची चर्चा आहे. अर्थात असे असले तरी याला नाशिकच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. नाशिकमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आणि नेत्यांशी जवळीक साधून कामे लायझनिंग म्हणून करून घेणारे काहीजण गोल्डन गँग म्हणून परिचित असून ते देखील रडारवर आले आहेत.
अशाच प्रकरणात नाशिकमध्ये अपर जिल्हाधिकारी 3 दर्जाच्या अधिकाऱ्यास एका हॉटेलमध्ये बोलावून हनी ट्रॅप लावला गेल्याची चर्चा आहे. या अधिकाऱ्याकडून नंतर कोट्यवधीची मागणी केली गेली. अधिकाऱ्याविरोधात एका महिलेने पोलिसांत तक्रार केली आणि नंतर मात्र ती मागे घेतली होती. त्यानंतर दीड दोन महिन्यांपूर्वी ठाणे येथे याच प्रकरणाशी संबंधित दोघांनी परस्परविरोधी तक्रार करून नंतर सामोपचाराने मागेही घेतली गेल्याने सध्या पोलिस दप्तरी यासंदर्भात कोणती नोंद नसल्याचे पोलिस यंत्रणेतील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.