पेठ तालुक्यातील गुरुजनांचे लाखमोलाचे दातृत्व! 15 लाखांची रुग्णवाहिका दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 14:31 IST2021-06-05T14:23:20+5:302021-06-05T14:31:11+5:30
Nashik News : पेठ तालुक्यातील शिक्षकांनी प्रत्येकी दोन हजारांची वर्गणी करून तब्बल 15 लाखांचा कोविड निधी अवघ्या एक महिन्यात उभा केला.

पेठ तालुक्यातील गुरुजनांचे लाखमोलाचे दातृत्व! 15 लाखांची रुग्णवाहिका दिली भेट
पेठ (नाशिक) - ज्ञानदानासोबत संकटकाळात आपल्याच समाजाच्या मदतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन कोरोनाच्या महामारीत जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी पेठ तालुक्यातील शिक्षकांनी तब्बल 15 लाखांचा एकत्रित निधी उभा करून आरोग्य विभागास सुसज्ज सर्व सोयीयुक्त रुग्णवाहिका भेट केली. पेठ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची झालेली धावपळ पाहून पेठ तालुक्यातील शिक्षकांनी प्रत्येकी दोन हजारांची वर्गणी करून तब्बल 15 लाखांचा कोविड निधी अवघ्या एक महिन्यात उभा केला.
तालुक्यातील वाडी वस्तीवरील सामान्य जनतेला तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सर्व उपचाराच्या सुविधा असलेली फोर्स ट्रॅव्हलर कंपनीची रूग्णवाहिका खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वाहन भांडार संकलनाच्या व फोर्स कंपनीच्या उज्वल फोर्स एजन्सी नाशिक यांच्या, सहकार्याने शासनाच्या GEM पोर्टलवरील रास्त दरात खरेदी करून आरोग्य विभागाच्या स्वाधीन केली. यामूळे कोरोनाकालावधी सह कायमस्वरूपी सदरची रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी सदैव उपलब्ध असणार आहे.
पेठ पंचायत समिती आवारात विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पेठचे आमदार, नरहरी झिरवाळ, जि.प. सदस्य भास्कर गावीत यांचे हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. यावेळी सभापती विलास अलबाड, उपसभापती, पूष्पा पवार, तुळशिराम वाघमारे, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदिप अहेर, तहसीलदार संदिप भोसले, गटविकास अधिकारी, नम्रता जगताप, अमित भूसावरे, गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप,तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. योगेश मोरे, डॉ. अभिजित नाईक, मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार, अनिल भडांगे यांचे सह पेठ तालुक्यातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमूख, शिक्षक, बीआरसी कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षक समन्वय समितीचा गौरव
पेठसारख्या छोट्या व दुर्गम तालुक्यातील शिक्षकांनी 15 लाखांचा कोरोना निधी जमा करून रुग्णवाहिका भेट दिल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक समन्वय समिती व गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांचा गौरव करण्यात आला. जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे ,शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी वैशाली वीर, नम्रता जगताप, सरोज जगताप, डॉ. योगेश मोरे, जी.पी खैरनार, अंबादास पाटील वाहन भांडार संकलन आरोग्य विभाग,आदी उपस्थित होते.