नाशिक : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरच्या कर समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ करसल्लागार सतीश बूब यांचे तुर्कीस्तानवरून परतीच्या प्रवासात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अलका बूब यांच्यासह मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. बूब हे महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सच्य शिष्टमंडळाबरोबर तुकीस्तानला गेले होते. दौरा संपून परतत असताना ही दुर्घटना घडली. नाशिकचे तज्ज्ञ कर सल्लागार अशी ख्याती मिळविलेले सतीश बूब १९८४ पासून कर व आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होते. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यातील सूक्ष्म-अतिसूक्ष्म तरतुदींचा त्यांचा गाढा अभ्यास होता. नाशिक टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, नॉर्थ महाराष्ट्र फोरम आॅफ टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन या संघटनांचे अध्यक्षपद त्यांनी समर्थपणे सांभाळले होते. प्रत्यक्ष कर समितीचे अध्यक्ष, सेल टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे कार्यकारिणी सदस्य, आॅल इंडिया फेडरेशन आॅफ टॅक्स कन्सल्टंट असोसिएशनचे सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे. महाराष्ट्र चेंबर पत्रिका, सेल्स टॅक्स रिव्ह्यू या मासिकांतून करविषयक घडामोडींवर ते नियमित लिखाण करीत होते. हाँगकाँग, शारजा, मॅको या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी पेपर सादर केले. व्हॅट, जीएसटी, आयकर या विषयांची व्यापारी व उद्योजकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या माध्यमातून राज्यभर दौरे करून परिसंवाद व परिषदा घेतल्या होत्या.
कर सल्लागार सतीश बूब यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:57 IST