साधनेतून मिळते चिरकाल प्रतिभा

By Admin | Updated: September 26, 2016 02:06 IST2016-09-26T02:06:28+5:302016-09-26T02:06:48+5:30

प्रकाश पाठक : प्रतिभा संगम संमेलनाचा समारोप

Sustainable talent will last forever | साधनेतून मिळते चिरकाल प्रतिभा

साधनेतून मिळते चिरकाल प्रतिभा

नाशिक : कलाक्षेत्रासह अन्य क्षेत्रांतही अतिशिघ्रतेने प्राप्त होणारी प्रतिभा अहंकार नावाच्या विषयाला जोडली जाण्याची भीती असते. त्यामुळे कलेच्या प्रांतात उंची गाठण्यासाठी अभ्यास, वाचन, व्यासंग, साधनेची व एकाग्रतेची गरज असून, या मार्गाने प्राप्त केलेली प्रतिभा चिरकाल टिकते, असे प्र्रतिपादन प्रा. प्रकाश पाठक यांनी केले.
रावसाहेब सभागृहात उभारण्यात आलेल्या महाकवी वामनदादा कर्डकनगरीत महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रतिभासंगम संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. निसर्गकवी नीलेश पाटील व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्यासह अभाविपचे शहराध्यक्ष डॉ. प्रशांत टोपे, प्रदेशमंत्री राम सातपुते, प्रमोद कऱ्हाड, अमोल अहिरे आदि उपस्थित होते.
पाठक म्हणाले, प्रसंगावधनता आणि त्या प्रसंगाच्या गांभीर्यातून उत्स्फूर्तपणे सुचणारे काव्य, कथा आदि विविध साहित्यप्रकार हे चिरकाळ टिकतात. कुसुमाग्रजांनी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’सारख्या गहन कविता लिहिल्या. त्या आजही चिरतरुण वाटतात. कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे ओजस्वी क्र ांतिकवी उभा राहतो आणि ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ असा गगनभेदी जयघोष कानी ऐकू येतो. त्यांनी १९६२च्या युद्धकाळात रचलेले हे गीत उत्स्फू र्त साहित्यरचनेचे उदाहरण असल्याचे मत पाठक यांनी व्यक्त केले. तसेच काश्मीर येथील उरी खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही प्रतिक्रिया उमटण्यासाठी उत्स्फूर्त रचना गरजेची असल्याचे ते म्हणाले.
वर्णन आणि अनुभव हे दोन वेगळे विषय असून, अनुभवातून रचनेत आत्मियता येते, तर वर्णनात शब्दांची झालर आल्याने त्यात आत्मियता नसल्याचे स्पष्ट जाणवते. अनुभवातून प्राप्त शक्तीच्या आधारे असामाजिकतेवर प्रहार करण्याचे बळ प्राप्त होत असल्याचे पाठक यांनी सांगितले. प्रास्ताविक राम सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत टोपे यांनी केले. अमोल अहिर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Sustainable talent will last forever