आखाड्यांमध्येही आता पुरवा सुविधा

By Admin | Updated: September 30, 2014 01:42 IST2014-09-30T01:42:05+5:302014-09-30T01:42:23+5:30

आखाड्यांमध्येही आता पुरवा सुविधा

Providing coverage in the Akhda also | आखाड्यांमध्येही आता पुरवा सुविधा

आखाड्यांमध्येही आता पुरवा सुविधा


नाशिक : कुंभमेळा सुरू होण्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, आर्थिक ओढाताणींमुळे कामे होत नाही अशी अवस्था आहे; परंतु त्यातच शहरातील आखाड्यांनी वेगळाच सूर आळवला असून, साधू-महंत आधी स्थानिक आखाड्यात वास्तव्यास येणार असून, त्यामुळे या आखाड्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी त्यांनी महापौर अशोक मुर्तडक यांच्याकडे केली. तथापि, महापौरांनी निधीअभावी हतबलता व्यक्त केली आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालण्याचे ठरविण्यात आले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी महापौर अशोक मुर्तडक यांची भेट घेतली. अलाहाबाद आणि उज्जैन येथे कुंभमेळा सुरू होण्याच्या आधी तीन महिने अगोदरच सर्व कामे पूर्ण झालेली असतात; परंतु नाशिकमध्ये तशी स्थिती नाही. कुंभमेळा सुरू होण्यासाठी अवघे दहा महिने उरले आहेत; परंतु त्यासाठी आवश्यक कामांना अद्याप गती मिळालेली नाही. त्यामुळे ही कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न केला. त्याचप्रमाणे कुंभमेळ्यासाठी येणारे साधू-महंत हे साधुग्राममध्ये जाण्याच्या अगोदर काही महिने स्थानिक आखाड्यांमध्ये वास्तव्यास असतात. त्यामुळे तेथे विविध मूलभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
महापौर अशोक मुर्तडक यांनी पालिकेची आर्थिक स्थिती विशद केली. महापालिकेने १०५२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला; परंतु राज्य शासनाने जेमतेम २२२ कोटी रुपयांचा निधी दिला असून, आणखी निधी राज्य शासन देण्यास तयार नाही. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यातच एलबीटीच्या माध्यमातून अपेक्षित उत्पन्न घटत असल्याने कामे करण्यासाठीच पुरेसा पैसा नाही, असे त्यांनी सांगितले. आता निधीसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच भेट घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले. यावर स्थानिक प्रतिनिधी आणि आखाड्यांनीही मोदी यांच्याकडे विनंती करण्यासाठी दिल्लीस येण्याची तयारी दर्शविली. महापौरांची भेट घेणाऱ्यांमध्ये धनंजय बेळे, रामकिशोर शास्त्री, भक्तिचरणदास, भोलादास महाराज, रामरतन महाराज यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Providing coverage in the Akhda also