महापालिकेतील आंदोलनकर्त्या नगरसेवकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 14:43 IST2019-06-28T14:43:12+5:302019-06-28T14:43:44+5:30
सत्ताधारी असूनही विरोधी पक्षांसोबत आंदोलन करणारे भाजपचे सभागृह नेते दिनकर पाटील यांची गुरुवारी रात्री पक्षाने पदावरून गच्छंती केली आहे

महापालिकेतील आंदोलनकर्त्या नगरसेवकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
नाशिक - बेकायदा धार्मिक स्थळे नियमित करावी तसेच अन्य मागण्यांसाठी मंगळवारी रात्रीपासून महापालिका सभागृहात भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ठिय्या मांडला होता. सभागृहात ठिय्या आंदोलन करणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची सभागृहातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले.
सत्ताधारी असूनही विरोधी पक्षांसोबत आंदोलन करणारे भाजपचे सभागृह नेते दिनकर पाटील यांची गुरुवारी रात्री पक्षाने पदावरून गच्छंती केली आहे त्यानंतर आता पोलीस बळाचा वापर करून आंदोलन बंद करण्याची तयारी सुरू प्रशासनाने केली आहे.
भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, मनसे माजी गटनेते सलीम शेख आणि भाजप नगरसेवक रवींद्र धिवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
महापालिकेची महासभा मंगळवारी (दि.२५) महासभा पार पडली. यावेळी शहरातील बेकायदा ठरविण्यात आलेल्या धार्मिक स्थळांना पाडू नये, सेंट्रल किचन योजना रद्द करून बचत गटांनाच हे काम द्यावे, सिडकोतील स्वतंत्र बांधकाम नियंत्रण नियमावली कायम ठेवावे आणि महापालिकेच्या सील केलेल्या मिळकती त्वरीत खुल्या कराव्यात या मागणीसाठी रात्री पाटील यांनी अचानक महापौरांच्या पिठासनाच्या पुढ्यात बसून आंदोलन सुरू केले. त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, मनसेचे माजी गटनेते सलीम शेख पाटील यांच्या प्रभागातून निवडून आलेले रविंद्र धिवरे यांनी साथ दिली. काही काळ वर्षा भालेराव यांनी देखील आंदोलन केले होते.