पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा

By Admin | Updated: September 4, 2016 01:16 IST2016-09-04T01:15:47+5:302016-09-04T01:16:28+5:30

अनुराधा गोरे : सियाचेनसंबंधी त्रुटींविषयी व्यक्त केली खंत

Pakistan has to teach a lesson | पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा

पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा

नाशिक : पाकिस्तान आणि चीन यांसारखे शेजारी असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सियाचेनमधून सैन्य काढून घेणे अशक्य असून, या भागात गेल्या ३४ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेले आॅपरेशन मेघदूत गिलगिटवर ताबा मिळवून संपवणे शक्य आहे. त्यासाठी पाकिस्तानला धडा शिकवून बाल्टिस्तानातील हा भाग काबीज करणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा गोरे यांनी व्यक्त केले.
शंकराचार्य न्यास आणि ज्योती स्टोअर्स यांच्या संयुक्त ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक नीलिमा गोरे यांनी लघुपट आणि चित्रफितीच्या साह्याने सियाचेनची ओळख करून दिली. यावेळी त्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम आणि साहित्यातील सियाचेनविषयी अल्पसमावेश आणि चुकीच्या माहितीविषयी खंत व्यक्त केली. तसेच सियाचेनचा सियाचीन असा करण्यात येणारा उल्लेख चुकीचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. व्यासपीठावर सुदेश हिंगलासपूरकर, वसंत खैरनार व राजाभाऊ मोगल उपस्थित होते.
गोरे म्हणाल्या, सियाचेनवर भारताचे सैनिक रोज मृत्यूशी झुंजत असताना अनेक जवानांना प्राण गमवावे लागले आहे. सियाचेनच्या शरीर गोठवून टाकणाऱ्या थंडीविषयी माहिती देताना या युद्धभूमीवर लढण्यासाठी जगाच्या पाठीवर कोणत्याही देशाने शस्त्र तयार केले नसल्याचे सांगताना येथे केवळ भारतीय जवानांच्या शौर्याच्या जोरावर सर्व प्रमुख खिंडी आणि हिमकडे भारतीय सैन्याच्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले. ते सोडले, तर कारगिलमधील धड्यानुसार पाकिस्तानसारखा दगाबाज शेजारी तिथले मोर्चे बळकावू शकतो आणि तिथून त्यांना हाकलणे दुरापास्त होईल. तसेच सियाचेनमार्गे पाकिस्तान व चिनी सेना एकमेकांशी मेळ घालू शकतात. त्यामुळे भारताला कोणत्याही परिस्थितीत सियाचीन सोडणे शक्य नसल्याचे सांगतांना गिलगिट ताब्यात घेऊन सियाचिनचे रक्षण करणे हा सियाचिन समस्येवर पर्याय असल्याचे गोरे म्हणाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Pakistan has to teach a lesson