संशयित इराणीकडून आठ गुन्हे उघडकीस

By Admin | Updated: January 23, 2016 23:55 IST2016-01-23T23:55:25+5:302016-01-23T23:55:52+5:30

लूट : कोल्हारच्या सराफाकडून २५ तोळे सोने हस्तगत

Out of eight crimes exposed by suspected Irani | संशयित इराणीकडून आठ गुन्हे उघडकीस

संशयित इराणीकडून आठ गुन्हे उघडकीस

इंदिरानगर : शहर परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिक व महिलांची लूट करणारा श्रीरामपूरमधील संशयित कंबर नुरअली इराणी (२७) यास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे़ त्याने इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत लुटीसह चेनस्रॅचिंगच्या आठ गुन्ह्यांची कबुली दिली असून, चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या कोल्हारच्या एका सराफाकडून २५ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे़
पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे गतवर्षी घडलेले तोतया पोलीस व चेनस्रॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना इंदिरानगर पोलिसांना श्रीरामपूरमधील कंबर नुरअली इराणी याची माहिती मिळाली़ इंदिरानगरच्या पोलीस पथकाने श्रीरामपूरला सापळा रचून त्यास अटक करून सखोल चौकशी केली असता त्याने इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील चार पोलीस बतावणी व दोन चेनस्नॅचिंगची कबुली दिली. तसेच उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतसुद्धा दोन वेळेस तोतया पोलीस बनून वृद्ध व्यक्तींकडील सोन्याची चोरी केल्याचे तपासात समोर आले़
संशयित इराणीने चोरीचा मुद्देमाल अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील कोल्हार येथील सराफी व्यावसायिक अजय विजय देडगावकर यांना विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी देडगावकरला अटक करून त्याच्याकडून २५ तोळे सोने जप्त केल्याचे पोलीस उपायुक्त धिवरे यांनी सांगितले़ दरम्यान, या संशयिताने शहरात आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे़ परिमंडळ दोनमध्ये गत महिनाभरात तोतया पोलीस किंवा चेनस्नॅचिंगचा एकही गुन्हा घडला नसल्याचा दावाही उपायुक्त धिवरे यांनी केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Out of eight crimes exposed by suspected Irani