सत्ताधिकारी मनसेच उतरणार रस्त्यावर

By Admin | Updated: July 23, 2014 00:24 IST2014-07-22T23:53:20+5:302014-07-23T00:24:43+5:30

कामे ठप्प : राज्य शासनाविरुद्ध होणार आक्रमक; आज बैठकीत रणनीती

Officials will go to Manasseh on the road | सत्ताधिकारी मनसेच उतरणार रस्त्यावर

सत्ताधिकारी मनसेच उतरणार रस्त्यावर

नाशिक : आर्थिक चणचण आणि अन्य कारणांमुळे पालिकेत नागरी आणि विकासकामे ठप्प झाली असून, विधानसभा निवडणुकीत याच मुद्द्याला मनसेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यावर राजकीय तोडगा सत्तारूढ मनसेने काढला आहे. राज्य सरकार ना पूर्णवेळ आयुक्त देत, ना कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधी. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका मनसेने घेतली असून, बुधवारी (दि. २३) सकाळी बैठकीत रणनीती ठरवून ती लगेचच अंमलात आणण्याची तयारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महापालिकेत सत्ता असून, राज ठाकरे यांची ही प्रयोगशाळा मानली जाते. गेल्या लोकसभा निवडणुकीत याच नाशिकमध्ये मनसेने काही कामे केली नाहीत, असा ठपका ठेवून विरोधकांनी मनसेवर टीका केली होती. अशी अवस्था विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये लक्ष घालून ट्राम, वायफायसह विविध योजनांची चाचपणी करण्याची तयारी केली खरी; परंतु पालिकेला पूर्णवेळ आयुक्तच मिळत नसल्याने कोणताही निर्णय होत नाही. चार महिन्यांपूर्वी आयुक्त संजय खंदारे यांची वादग्रस्त निर्णयामुळे राज्य शासनाने उचलबांगडी केली. त्यानंतर नवीन आयुक्त देण्यात आला नसून प्रभारी आयुक्तांच्या जोरावर पालिकेचा गाडा कसाबसा हाकलला जात आहे. आयुक्त कामचलावू निर्णय घेत असून, कोणताही धोरणात्मक निर्णय घेत नाहीत. छोट्या-मोठ्या कामांच्या फायलींवर सह्याच करीत नसल्याने कामे खोळंबली आहेत. मनसेने राज्य शासनाकडे पूर्णवेळ आयुक्तांची मागणी केली. राज ठाकरे हे स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलले असताना ही परिस्थिती उद्भवली आहे. विरोधकांची नव्हे, तर मनसेची कोणतीही कामे होत नसल्याने अस्वस्थ असलेल्या नगरसेवकांना हीच जाणीव देऊन आंदोलनासाठी तयार करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता ‘रामायण’ येथे नगरसेवकांची बैठक होणार असून, त्यात आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार आहे. कदाचित, बुधवारीच आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Officials will go to Manasseh on the road