अपघात नाही, तर हत्या; त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून अपघाताचा बनाव उघड; एका वर्षापूर्वीच्या वादाचा असा घेतला सूडाचा बदला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:06 IST2026-01-08T16:06:53+5:302026-01-08T16:06:53+5:30
एक वर्षापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून विष्णू गांगुर्डे यांचा पाठलाग केला होता.

अपघात नाही, तर हत्या; त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून अपघाताचा बनाव उघड; एका वर्षापूर्वीच्या वादाचा असा घेतला सूडाचा बदला
Nashik Crime: त्र्यंबकेश्वर येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेला अपघात नसून तो प्रत्यक्षात खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या 3 तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका सराईत संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून कोयता, चाकू, आधुनिक धनुष्यबाण आदी प्राणघातक हत्यारे ताब्यात घेण्यात आली आहेत. सदर आरोपीवर पिंपळगाव व त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल असून, पुणे परिसरातही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे.
२६ नोव्हेंबर २०२४ रोजी त्र्यंबकेश्वर हद्दीत एक अपघात झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला मोटार वाहन कायद्यानुसार अपघाताची नोंद करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा केवळ अपघात नसून पूर्व वैमनस्यातून केलेला पद्धतशीर कट असल्याचे उघड झाले आहे. संशयित आरोपी युवराज मोहन शिंदे (३१, रा. तळेगाव काचुलीं, सध्या रा. सातपूर, नाशिक) याने एक वर्षापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून विष्णू गांगुर्डे यांचा पाठलाग केला.
त्यानंतर आपल्या ताब्यातील मोटारीने त्यांना जाणीवपूर्वक धडक देऊन त्यांचा खून केल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले आणि त्र्यंबकेश्वरचे पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली.