नूतन कार्यकारिणीला बुधवारचा मुहूर्त

By Admin | Updated: April 9, 2017 00:12 IST2017-04-09T00:12:28+5:302017-04-09T00:12:39+5:30

नाशिक : सावानाचे काळजीवाहू अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी बुधवारी (दि. १२) नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

New majourate to the new executive | नूतन कार्यकारिणीला बुधवारचा मुहूर्त

नूतन कार्यकारिणीला बुधवारचा मुहूर्त

 नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीचे अधिकृत निकाल शुक्रवारी (दि. ७) निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी नाट्यमयरीत्या जाहीर केल्यानंतर सावानाचे काळजीवाहू अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी बुधवारी (दि. १२) नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
बुधवारी (दि.१२) सार्वजनिक वाचनालयाच्या मिटिंग हॉलमध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या बैठकीत कार्याध्यक्ष, प्रमुख सचिव, सहायक सचिव, ग्रंथसचिव, अर्थसचिव, सांस्कृतिक कार्यसचिव, नाट्यगृह सचिव आणि वस्तुसंग्रहालय सचिव आदि नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. यावेळी बँकेतील तसेच आर्थिक व्यवहार करण्यासाठी सह्यांचेदेखील अधिकार बदलण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. ग्रंथमित्र पॅनलला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर आता कार्याध्यक्ष, कार्यवाह आणि अर्थसचिवपदी पॅनलमधील कोणत्या विजयी उमेदवारांची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि. ११) संध्याकाळी साडेसहा वाजता वाचनालयाच्या मिटिंग हॉलमध्ये वाचनालयाच्या मावळत्या कार्यकारिणीला निरोप आणि नूतन कार्यकारिणीच्या स्वागत सोहळ्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती विलास औरंगाबादकर यांनी दिली. शुक्रवारी (दि. ७) निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी फेरमतमोजणीची प्रक्रिया एका महिन्यापर्यंत स्थगित केल्यानंतर संध्याकाळी घाईघाईत अंतिम आणि एकत्रित निकालपत्र काळजीवाहू अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांच्याकडे सुपूर्द करताना अठराव्या क्रमांकाचे विजयी उमेदवार धनंजय बेळे यांचे नाव समाविष्ट केले असले तरी हे नाव समाविष्ट करताना बेळे यांचा यादीतील समावेश फेरमतमोजणीच्या अंतिम निकालाला अधीन राहून केला असल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याने फेरमतमोजणीच्या निकालाचे औत्सुक्य कायम आहे. (प्रतिनिधी)

Web Title: New majourate to the new executive