तीन घरफोड्यांमध्ये दीड लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 17:50 IST2018-06-20T17:50:41+5:302018-06-20T17:50:41+5:30
नाशिक : शहरात गत अनेक दिवसांपासून घरफोडी सत्र सुरू असून, जेलरोड, गंगापूररोड व वडाळा-पाथर्डी रोड परिसरात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइलचा समावेश आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

तीन घरफोड्यांमध्ये दीड लाखाचा ऐवज लंपास
नाशिक : शहरात गत अनेक दिवसांपासून घरफोडी सत्र सुरू असून, जेलरोड, गंगापूररोड व वडाळा-पाथर्डी रोड परिसरात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइलचा समावेश आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. १९) दुपारच्या सुमारास जेलरोडच्या कॅनॉल रोड परिसरात घडली़ पंचगंगा हौसिंग सोसायटीतील धमेंद्र अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारच्या सुमारास घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील बेडरूममध्ये ठेवलेले पाऊण लाखाचे दागिने चोरून नेले़ यामध्ये पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, पाच हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व २० हजार रुपयांच्या नेकलेसचा समावेश आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरात घरफोडीची दुसरी घटना शनिवारी (दि़ १६) घडली़ संगीता तारगे (रा़ श्रद्धा बंगला, पोस्ट आॅफिसशेजारी, सावरकरनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बबिता ऊर्फ बेबी ज्ञानेश्वर कासार हिने तारगे बंगल्यातील बेडरूममध्ये प्रवेश करून ओम आकाराचे सोन्याचे लॉकेट व सोन्याची चेन असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी घटना वडाळा-पाथर्डी रोडवरील विनयनगरलगत असलेल्या कालिका पेट्रोलपंप परिसरात मंगळवारी (दि़ १९) घडली़ सुनील शिंदे (रा़ उज्ज्वल बंगला, संत नामदेव सोसायटीशेजारी, विनयनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या जिन्याजवळील लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला़ तसेच बेडरूममधून पलंगावर असलेला दहा हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल फोन चोरून नेला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़