नाशिकच्या महापौर निवडणुकीत मनसे भाजपासोबत की महाशिवआघाडीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 17:39 IST2019-11-19T16:58:19+5:302019-11-19T17:39:35+5:30
महापौर निवडणूकीत पाठिंबा देण्याच्या विनंतीसाठी गेलो असल्याचा खुलासा उध्दव निमसे आणि गांगुर्डे यांनी केला आहे.

नाशिकच्या महापौर निवडणुकीत मनसे भाजपासोबत की महाशिवआघाडीत?
नाशिक- महापालिकेत बहुमत असतानाही भाजपातील सात ते आठ नगरसेवक फुटण्याची शक्यता गृहीत धरून राजकिय समिकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून मंगळवारी (दि.१९) भाजपाच्या वतीने मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तथापि, यापूर्वी शिवसेनेने देखील मनसेशी संपर्क साधला आहे. दुपारी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व मनसे नगरसेवक मुंबईत त्यांना भेटण्यासाठी गेले असून आता ते काय निर्णय देतात याकडे लक्ष लागून आहे.
नाशिक महापालिकेत भाजपचे ६५ नगरसेवक असले तरी त्यातील आठ ते दहा माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असून त्यामुळे ते नेत्यांच्या सपंर्कात नाहीत की, ते पक्षाच्या अन्य नगरसेवकांबरोबर सहलीवर गेले नाहीत. सहाजिकच भाजपला फाटाफुटीची धास्ती असल्याने अन्य पक्षातील नगरसेवक फोडण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्याच्या हालचाली सुरू आहेत.
मंगळवारी (दि.१९) भाजपचे स्थायी समिती सभापती उध्दव निमसे आणि माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी नाशिकमधील मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगडावर जाऊन जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी आणि माजी गटनेता सलीम शेख यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, या चर्चेनंतर मनसेचे पदाधिकारी आणि नगरसेवक राज ठाकरे यांना भेटण्यासाठी रवाना झाले. महापौर निवडणूकीत पाठिंबा देण्याच्या विनंतीसाठी गेलो असल्याचा खुलासा उध्दव निमसे आणि गांगुर्डे यांनी केला आहे. मात्र, पक्षाची भुमिका राज ठाकरे हेच बुधवारी किंवा गुरूवारी घोषित करतील असे माजी गटनेते सलीम शेख यांनी सांगितले