मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 09:16 IST2025-12-22T09:14:42+5:302025-12-22T09:16:14+5:30
मित्रपक्षांशी एकीकडे बैठकांचे सत्र, युतीसाठी बोलणी सुरू असताना भाजपाचे २ प्रमुख पदाधिकारी स्वबळाच्या घोषणा करत असल्याने भाजपाच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
नाशिक - महापालिकेच्या जागावाटपासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांची बैठक होऊनही संपूर्ण चर्चा जागा वाटपाच्या आकड्यांवर अडकली आहे. शिंदेसेना ४०-४५ जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ३०-३५ जागांची मागणी करण्यात आल्याने चर्चेची गाडी पुढेच सरकू शकलेली नाही असं समजते. मंत्री गिरीश महाजन यांचं रात्री उशिरापर्यंत प्रमुख नेत्यांसोबत खलबते सुरू होती. पक्ष नेत्यांच्या भेटीनंतर स्थानिक पातळीवरील कोअर कमिटीच्या बैठकादेखील घेण्यास सांगितले होते. मात्र महायुतीतील घटक पक्षांना चर्चेचे गुन्हाळ सुरू ठेवत काँग्रेस, राष्ट्रवादीतील दिग्गज विरोधकांनाही स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. त्यामुळे शत्रूंनाच नव्हे तर मित्रांनादेखील गाफील ठेवण्याची अनोखी रणनीती आखून भाजपाकडून स्वबळाची खेळी खेळली जाणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.
भाजपाचे निवडणूक प्रभारी असलेले मंत्री गिरीश महाजन हे नाशिक महापालिकेत युती करण्याचे निर्देश असल्याचे सांगत युतीची बोलणी करत आहेत. मात्र भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार हे भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा जाहीरपणे करतात. निवडणूक प्रमुख म्हणून नुकतीच निवड झालेल्या आमदार देवयानी फरांदे यादेखील सर्वच जागांवर कमळच फुलवणार म्हणत एकप्रकारे स्वबळाचेच संकेत देत आहेत. महाजनांकडून युतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू केल्यानंतर तसेच मित्रपक्षांशी एकीकडे बैठकांचे सत्र, युतीसाठी बोलणी सुरू असताना भाजपाचे २ प्रमुख पदाधिकारी स्वबळाच्या घोषणा करत असल्याने भाजपाच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मोठ्या विरोधकांवर जाळे
शहरातील विरोधी गटांतील मोठे विरोधकच भाजपाकडे खेचून घेऊन दिग्गज विरोधकच संपुष्टात आणण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांतील स्वबळावर निवडून येण्याची शक्यता असलेल्या नेत्यांनाच आपल्या तंबूत खेचून विरोधकच नामशेष करण्याचा डाव सुरु आहे.
काही इच्छुकांचा डबलगेम
युतीच्या चर्चा सुरू झाल्यावर ज्या जागा हमखासपणे मित्रपक्षातील इतरांना मिळू शकतात, अशा जागांवरील भाजपचे उमेदवार विरोधी पक्षांच्या आघाड्यांशी संधान बांधू लागले आहेत. त्यामुळे भाजपने युती केली तर त्यातील काही चांगले इच्छुक विरोधी उद्धवसेनेसह मनसेकडे जाण्याचीही चर्चा सुरू आहे.