Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 10:19 IST2025-09-26T10:16:47+5:302025-09-26T10:19:30+5:30
Nashik Crime news: नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी फाट्यावर एका २२ वर्षीय तरुणाची चॉपर आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. त्याच्या मैत्रिणीनेच हल्लेखोरांना टीप दिली होती, अशी माहिती तपासातून समोर आली.

Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
Nashik Crime latest news: पूर्वनियोजित कट रचून एका तरुणाची कोयता आणि चॉपरने वार करत हत्या करण्यात आली. या घटनेने नाशिक हादरले. पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका कॅफेमध्ये गुरुवारी भरदिवसा (२५ सप्टेंबर) ही घटना घडली. घटना घडताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृताच्या नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांची गर्दी जमल्याने दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राशिद हारुन खान (२२, रा. अंबड लिंक रोड, खाडी) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
तरुणाची हत्या का करण्यात आली?
अंबड लिंक रोडवर असलेल्या दत्तनगर व खाडीच्या भागात राहणाऱ्या राशिद याच्यासोबत त्याच भागातील 'गॅस गँग'मधील टोळक्याने काही महिन्यांपूर्वी वाद घातला होता. तेव्हाही अंबड पोलिसांकडे तक्रार दिली होती. तेव्हाही पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे.
मैत्रिणीने भेटायला बोलावले आणि आरोपींना टीप दिली
पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील निसर्ग कॉलनी परिसरात असलेल्या एका कॅफेमध्ये राशिद हा त्याच्या मैत्रिणीने बोलविल्यामुळे चहा पिण्यासाठी थांबला होता. यावेळी त्या युवतीने मारेकऱ्यांना तो आल्याबाबतची माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले.
हल्लेखोरांनी तेथे येऊन चॉपर, कोयत्याने राशिदवर वार केले. या घटनेने परिसरात प्रचंड भीतीचे १ वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांच्या पथकाने धाव घेतली. पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी पाहणी करून बंदोबस्त वाढविला.
पंचनामा करून मृतदेह तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविला. तसेच पोलिसांच्या श्वान पथकासह फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. अंबड लिंक रोड परिसरातून मृताच्या नातेवाइकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी आक्रोश करत टाहो फोडला. परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ लागल्याने दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मृताच्या भावाचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया इंदिरानगर पोलिस ठाण्यात सुरू होती.
गयासुद्दीन याने सूत्रे हलविल्याचा संशय
मृत राशिद याच्या घरावर काही दिवसांपूर्वी हल्ला केल्याची घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. तेव्हापासून संशयित गयासुद्दीन हा परराज्यात पळून गेला आहे. राशिद हा कॅफेमध्ये आल्यानंतर त्याने तेथून संपर्क साधत येथील दोघा साथीदारांना पाठवून राशिदवर हल्ला चढविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
"माझा भाऊ पाथर्डी गावात कामानिमित्त गेला होता. तेथून तो दुपारी घराकडे येत असताना पाथर्डी फाट्याजवळ रस्त्यात एका कॅफेमध्ये चहा पिण्यासाठी थांबला. तेथे संशयित हाशिम वारसी, अदनान वारसी व त्याच्या साथीदारांनी येऊन माझ्या भावाला ठार मारले. जोपर्यंत त्यांच्यावर पोलिस कठोर कारवाई करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही", असे मयत तरुणाचा मोठा भाऊ इमरान खान याने सांगितले.
युवतीसह सहाजणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
राशिदला त्याच्या एका मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलविले होते. यावेळी तो आल्यानंतर तिने मारेकऱ्यांना त्याची टीप दिली, असे इंदिरानगर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. यामुळे पथकाने त्या युवतीलाही ताब्यात घेत या गुन्ह्यात आरोपी केले आहे. सायंकाळी उशीरापर्यंत पोलिसांनी तीच्या सह एकूण सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. इंदिरानगर गुन्हे शोध पथकासह गुन्हे शाखा युनिट एक व दोनचे पथक उर्वरित हल्लेखोरांच्या शोधार्थ रवाना करण्यात आले आहेत.
"खुनाच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांत पोलिसांच्या विविध पथकांनी सहा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याशी संबंधित आणखी काही संशयित असण्याची शक्यता असून त्यांचाही शोध घेतला जात आहे. कोणीही अफवा पसरवू नये. गुन्हेगारांची गय केली जाणार नाही", असे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले.