१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:31 IST2025-09-22T19:31:01+5:302025-09-22T19:31:26+5:30

नाशिकमध्ये चार दिवसांपूर्वी एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात भाजप नगरसेवकाला अटक करण्यात आली.

Nashik Crime Former BJP group leader Jagdish Patil arrested in firing plot | १५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

Nashik Crime: पंचवटी पेठरोडवरील राहुलवाडीत मागील आठवड्यात मध्यरात्री सराईत गुन्हेगार सागर जाधव याच्यावर दोघा तडीपार गुंडांनी दोन गोळ्या झाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात भाजपचे माजी गटनेते तथा नगरसेवक संशयित जगदीश पाटील यांना पंचवटी पोलिसांनी रविवारी ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. खुनाच्या गुन्ह्यात पाच दिवसांपूर्वीच भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक करण्यात आली होती. पंचवटीमधील भाजपचे दोन मोठे मासे लागोपाठ पोलिसांच्या गळाला लागल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पंचवटीत २०१७ साली किरण निकम याचा खून करण्यात आला होता. या निकम टोळीतील तडीपार गुंड संशयित विकी उत्तम वाघ व विकास ऊर्फ विकी विनोद वाघ या दोघांनी मंगळवारी रात्री दुचाकीने येत जाधव यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. एक गोळी त्याच्या जबड्यातून आरपार जाऊन मानेत शिरली होती. तो गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या गोळीबाराच्या कटात जगदीश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे तपासामधून पोलिसांच्या हाती लागले आहेत. या पुराव्यांवरून सहभाग निष्पन्न झाल्यामुळे त्यांना पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिली. याप्रकरणी जगदीश पाटील यांना सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयात पंचवटी पोलिस हजर करणार आहेत. न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची पोलिस कोठडीत पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांचे नाव निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सांगितले. जगदीश पाटील यांनी संशयित आरोपींसोबत वेळोवेळी मोबाइलवरून संपर्क साधल्याचे स्पष्ट झाले आहे. गोळीबाराच्या घटनेअगोदर पाटील यांनी घटनास्थळावर भेट दिल्याचेही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. तसेच हा कट रचून तो तडीस नेण्यासाठी आर्थिक मदत पुरवल्याच्या संशयावरून रविवारी सकाळी गुन्हे शोध पथकाने पाटील यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

सागर जाधव याचे पाटील यांच्या कुटुंबासोबत पूर्ववैमनस्य होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जाधव याचा निकम खून प्रकरणातही सहभाग असल्यामुळे त्यांनी त्या निकम टोळीतील विकास वाध, विकी वाघ व अमोल ऊर्फ बबल्या यांना हाताशी धरून गोळीबाराचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे, पाटील यांच्यावर कारवाई केल्यानंतर पोलिस प्रशासनावर वेगवेगळ्या राजकिय नेतेमंडळींसह काही मंत्र्यांकडूनदेखील विचारणा झाली. यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव वाढल्याची चर्चा शहरात रंगली होती.

दरम्यान, पोलिसांनी संशयित नीलेश पवार, आकाश निकम, रोशन अहिरे, साहिल शेख, सचिन गांगुर्डे, इरफान खाटीक, आकाश ऊर्फ बंटी दोंदे, आदित्य आहिरे, नितीन खलसे, साहिल शेखा, भारत कंकाळ, योगेश जाधव या अकरा आरोपींना अटक केली आहे.  तर मुख्य हल्लेखोर विकास ऊर्फ विकी विनोद वाघ, अमोल पारे ऊर्फ बबल्या, विकी उत्तम वाघ हे अद्यापही फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. यापैकी दोन्ही विकी साहिल, नितीन, योगेश हे पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे.
 

Web Title: Nashik Crime Former BJP group leader Jagdish Patil arrested in firing plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.