टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 21:12 IST2025-10-04T21:11:49+5:302025-10-04T21:12:06+5:30
नाशिकमध्ये टोकाचं पाऊल उचलेल्या माय लेकीला एका माजी सैनिकाने वाचवलं.

टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
Nashik Crime: गेल्या महिन्यात नाशकात पावसाने कहर केला असताना एका दुर्दैवी घटनेपासून एका सजग नागरिकाने माय-लेकीचे प्राण वाचवले. भरपावसात माजी सैनिक दिनकर पवार यांनी दाखविलेल्या सजगतेमुळे माय-लेकीचा जीव वाचवला.गेल्या महिन्यात २४ सप्टेंबरला सायंकाळी तुफान पाऊस कोसळत असल्याने गोदावरी नदी दुधडी भरून वाहत होती. त्याचवेळी भगूरहून स्वतःच्या कारने भाजप नाशिक महानगर जिल्हा सैनिक आघाडीचे संयोजक दिनकर पवार हे टाकळीच्या फिल्ट्रेशन प्लांटनजीकच्या पुलावरून जात होते. त्यावेळी पुलाच्या कठड्यावर युवतीसह महिला उभी असल्याचे दिसताच पवार यांनी तत्काळ गाडी थांबवली.
दिनकर पवार यांनी त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही इथे काय करताय, अशी विचारणा केली. त्यावेळी सैरभर आणि घाबरलेल्या अवस्थेतील त्या दोघी पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या मनःस्थितीत होत्या. पवार यांच्या सहानुभूतीच्या शब्दांनी त्या ओक्साबोक्सी रडू लागल्या. त्या दोघींना पवार यांनी आधी पुलावरून मागे घेत गाडीत बसवून त्यांना शांत केले. त्यानंतर त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचे कारण सांगितले. दोघांनी सांगितलेला प्रकार ऐकून दिनकर पवार यांना धक्का बसला आणि त्यांनी ही भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांना सांगितली.केदार यांनी पवारांसह माय-लेकीच्या घरी धाव घेत त्यांना धीर दिला. तसेच पोलिस कारवाईसह संबंधितांना धडा शिकविण्याचा शब्द दिला.
नेमकं काय घडलं?
आत्महत्या करायला निघालेल्या युवतीच्या वडिलांचे निधन झाले असून ती पुण्याच्या नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होती. एक दिवस तिच्या वर्गमित्राने थंड पेयामधून तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर मित्र व त्याच्या साथीदारांनी तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर ते फोटो व व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले. दरम्यान, मुलीशी झालेल्या संवादात आईला मुलीचे वागणे संशयास्पद वाटू लागले म्हणून तिने काळजीपोटी चौकशी केली असता हे प्रकरण उघडकीस आले. घडलेला प्रकार ऐकून आईला धक्काच बसला. या प्रकरणाचा दोघींना प्रचंड मनःस्ताप झाला. आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून २४ सप्टेंबरच्या संध्याकाळी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुदैवाने त्यांना वाचवण्यात आले.