टिप्पर गँगच्या म्होरक्यांना मोक्का

By Admin | Updated: July 3, 2016 01:03 IST2016-07-03T00:47:42+5:302016-07-03T01:03:17+5:30

कारवाई : नासीर पठाण, गण्या कावळेसह आठ जणांचा समावेश

Mukhtar of Tipper Gang pirates | टिप्पर गँगच्या म्होरक्यांना मोक्का

टिप्पर गँगच्या म्होरक्यांना मोक्का

 नाशिक : सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गँगचा सूत्रधार नासीर पठाण, गण्या कावळ्या यांच्यासह आठ सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे़ या सर्वांना जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी यांच्या न्यायालयात हजर केले असता १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ या सर्वांवर काही दिवसांपूर्वीच अंबड पोलीस ठाण्यात सिडकोतील फळविक्रेत्यांकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता़
सिडकोतील टिप्पर गँगचे प्रमुख सूत्रधार न्यायालयीन कोठडीत असतानाही शहरात गुन्हेगारीच्या घटना घडत होत्या़ पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांना टिप्परची दुसरी फळी सक्रिय झाल्याचे काही प्रकरणांवरून लक्षात येताच त्यांनी शाकीर नासीर पठाण, गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या, मुकेश दलपतसिंग राजपतू, वसीम शेख, शाहीद सय्यद, सोन्या, बापू पवार, देवदत्त तुळशीराम घाटोळे, किरण ज्ञानेश्वर पेलमहाले या सर्वांवर मोक्कान्वये कारवाई केली़ या टोळीचे गुन्हे व पुरावे शोधण्याचे काम पोलीस कोठडीदरम्यान केले जाणार आहे़
पोलिसांनी मोक्कान्वये कारवाई केलेल्या गुन्हेगारांनी सिडकोतील शुभम पार्कमधील एका फळविक्रेत्यांकडून पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली होती़ तसेच या गुन्ह्यातील तक्रारदाराचे अपहरण करण्याचा प्रयत्नही या टोळीने केला होता़, तर काही दिवसांपूर्वीच टिप्परच्याच अजिंक्य चव्हाणचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याची घटना घडली होती़

Web Title: Mukhtar of Tipper Gang pirates