सजावटीच्या रेडिमेड वस्तूंनी बहरली बाजारपेठ

By Admin | Updated: September 4, 2016 01:11 IST2016-09-04T01:02:59+5:302016-09-04T01:11:00+5:30

गणरायाचे आगमन : आकर्षक प्लास्टिकची फुले, रंगीबेरंगी माळा, चक्र यांना मागणी

The market is full of decorative, readymade goods | सजावटीच्या रेडिमेड वस्तूंनी बहरली बाजारपेठ

सजावटीच्या रेडिमेड वस्तूंनी बहरली बाजारपेठ

नाशिक : धावपळीचे जीवन आणि सण साजरे करताना एकमेकांशी लागलेली स्पर्धा यामुळे एकेकाळी स्वत: राबून तयार केली जाणारी गणेशोत्सवाची सजावट हल्ली रेडिमेड वस्तूंद्वारे केली जात आहे. यामुळे कल्पकतेने, नैसर्गिक साहित्य वापरून केलेली जीवंत सजावट हल्ली कृत्रिम वाटू लागली आहे. या कृत्रिम सजावटीलाच जास्त महत्त्व दिले जात असल्याने त्याची बाजारपेठ सध्या जोरात चलती सुरू आहे.
मेनरोड, रविवार कारंजा यांसह उपनगरांतील बाजारपेठेत मखर, फुलांच्या माळा, तोरणे, चमकदार बल्ब, मोरपिसे, छत्र्या, रेडिमेड मंडप यांची रेलचेल दिसत आहे. गणेशोत्सव मंडळांकडे कार्यकर्त्यांचा ताफा असला तरीदेखील सजावटीचे साहित्य रेडिमेड आणण्यावरच भर दिला जात आहे. घरगुती आराससाठीही हाच मार्ग अवलंबला जात आहे.
सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा बोलबाला असला तरी सजावटीच्या वस्तू खरेदी करताना त्यांचा सोयिस्कर विसर पडत असल्याचे दिसून येत आहे. शाळा, सामाजिक संस्था शाडूमातीची गणेशमूर्ती तयार करण्याचे धडे देत असली आणि आबालवृद्धांकडून आवडीने तशा मूर्ती तयार होऊन गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी विराजमान होणार असल्या तरी त्याच घरी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीही आणल्या जात असल्याने मूळ हेतुला हरताळ फासला जात असल्याची स्थिती दिसून येत आहे.
गणेशोत्सवात यंदादेखील कापड, प्लास्टिक आदि विविध प्रकारांमध्ये फुले, फ्लॉवरपॉट, फ्लॉवर स्टॅँड यांची रेलचेल दिसत आहे. दहा रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत हे साहित्य उपलब्ध असून नावीन्यतेमुळे त्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.
गतवर्षीच्या तुलनेत या वस्तूंच्या दरात १० टक्के भाववाढ झाली असल्याची माहिती रविवार पेठे येथील विक्रेते अर्जुन पवार यांनी दिली. आराससाठी जसे साहित्यांमध्ये वैविध्य दिसत आहे तसेच वैविध्य गणरायाच्या अलंकारांमध्येही दिसत असून सोने, चांदी, इतर धातू, खडे, आॅक्साईड आदि प्रकारांतले वैविध्यपूर्ण दागिने बाजारात दाखल झाले आहेत.
सोन्याची पॉलिश असलेले खोटे दागिनेही भाव खाऊन जात आहेत. त्यात मोदक, जास्वंदीच्या फुलांची माळ, जाळीदार उपरणे, मुकुट, दुर्वांची माळ, त्रिशूळ, शंख, कर्णफुले, बाजूबंद, आरतीचे ताट, पंचधातूचा चौरंग असे असंख्य प्रकार पहायला मिळत आहेत. दरवर्षी एकेक वस्तू खरेदी करीत सेट पूर्ण करण्यावर अनेक कुटुंबीयांकडून भर दिला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The market is full of decorative, readymade goods