दोघी बहिणींकडून इको फ्रेण्डली गणेशोत्सवाचा जागर

By Admin | Updated: September 4, 2016 01:12 IST2016-09-04T01:04:46+5:302016-09-04T01:12:48+5:30

जनजागृती : विद्यार्थी साकारतात बाप्पाचे विलोभनीय रूप

Joker of Ganeshotsav from Eco Frendli from both sisters | दोघी बहिणींकडून इको फ्रेण्डली गणेशोत्सवाचा जागर

दोघी बहिणींकडून इको फ्रेण्डली गणेशोत्सवाचा जागर

 नाशिक : सामाजिक एकोप्याचे प्रतीक ठरत असलेला गणेशोत्सव पर्यावरण ऱ्हासास कारणीभूत ठरू नये तसेच या उत्सवाचे पावित्र्य जपले जावे याकरिता प्रत्येकांनी इको फ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करावा, या भावनेतून पंचवटीतील दोघी बहिणी शहरातील शाळांमध्ये जागर करीत आहेत.
जीडी आर्टचे शिक्षण घेत असलेली स्नेहा आणि श्रद्धा शिंदे या दोघी बहिणी गेल्या तीन वर्षांपासून शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन मुलांना शाडूमातीपासून गणपती बनविण्याचे मुलांना धडे देत आहेत. यासाठी ते कुठल्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत. केवळ सामाजिक भावनेच्या जाणिवेतूनच त्यांनी या कार्याचा वसा घेतला आहे.
दरवर्षी दहा ते बारा शाळांमधील हजारो मुलांना ते बाप्पाचे विलोभनीय रूप साकारण्यासाठी मदत करीत आहेत. केवळ मूर्तीच बनविणे शिकवित नाही, तर त्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी यासाठीदेखील त्यांचा आग्रह असतो.
याबाबत स्नेहाने सांगितले की, वयाच्या आठव्या वर्षापासून तिला मातीचा गणपती बनविण्याची आवड निर्माण झाली. पुढे याच क्षेत्रात काम करावे या भावनेतून तिने जीडी आर्ट्सला प्रवेश घेतला; मात्र सामाजिक संवेदना जपता याव्यात याकरिता तिने शाळांमध्ये जनजागृती करण्याचे ठरविले. सुरुवातीला स्वत:हून शाळांमध्ये जाऊन दोघी बहिणींनी विद्यार्थ्यांना शाडूच्यामातीचे गणपती बनविण्याचे धडे दिले. आता शाळा स्वत:हून त्यांना बोलावून एकदिवसीय कार्यशाळा घेण्याबाबत आग्रह करतात. स्नेहा आणि श्रद्धा यांनी आतापर्यंत शहरातील कित्येक शाळांमध्ये शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्यातदेखील ही जनजागृती मोहीम अशीच पुढे चालू ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असा त्यांचा मानस आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Joker of Ganeshotsav from Eco Frendli from both sisters