‘स्थायी’च्या सभापतिपदासाठी जाधव - गांगुर्डे यांच्यात चुरस

By Admin | Updated: March 31, 2017 00:20 IST2017-03-31T00:19:59+5:302017-03-31T00:20:12+5:30

नाशिक : सभापतिपदासाठी भाजपात प्रामुख्याने मनसेतून आलेले शशिकांत जाधव आणि कॉँग्रेसमधून आलेले शिवाजी गांगुर्डे यांच्यात चुरस आहे

Jadhav for the 'Permanent' chairmanship - Chungra in Gangurde | ‘स्थायी’च्या सभापतिपदासाठी जाधव - गांगुर्डे यांच्यात चुरस

‘स्थायी’च्या सभापतिपदासाठी जाधव - गांगुर्डे यांच्यात चुरस

 नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सभापतिपदासाठी भाजपात प्रामुख्याने मनसेतून आलेले शशिकांत जाधव आणि कॉँग्रेसमधून आलेले शिवाजी गांगुर्डे यांच्यात चुरस आहे. पक्षश्रेष्ठी कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात याकडे आता लक्ष लागून आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सभापतिपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि.३०) विशेष महासभेत घोषित केली. स्थायी समितीवर भाजपा - ९, शिवसेना - ४, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांचा प्रत्येकी एक सदस्य नियुक्त करण्यात आला आहे. त्यात भाजपाने पंचवटीतील जगदीश पाटील, सुनीता पिंगळे, सातपूरमधून शशिकांत जाधव, पश्चिममधून शिवाजी गांगुर्डे, नाशिकरोडमधून विशाल संगमनेरे, सीमा ताजणे, सिडकोतून अलका अहिरे, मुकेश शहाणे व श्याम बडोदे यांना पहिल्या वर्षी संधी दिली आहे. स्थायीवर नियुक्ती करताना भाजपाने पूर्व विभाग वगळता अन्य सर्व विभागांना प्रतिनिधित्व दिले आहे. स्थायी समितीवर पूर्ण बहुमत असल्याने आता सभापतिपदासाठी शशिकांत जाधव आणि शिवाजी गांगुर्डे यांच्यात चुरस आहे. शशिकांत जाधव हे तीन वेळा महापालिकेवर निवडून आले असून, मागील पंचवार्षिक काळात मनसेतून त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
मनसेच्या सत्ताकाळात ते महापौरपदाचे दावेदार होते, परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली होती. आता भाजपाकडून निवडून गेल्यानंतर त्यांची स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, सभापतिपदासाठी पाच वेळा महापालिकेवर निवडून आलेले शिवाजी गांगुर्डे यांचेही नाव अग्रभागी आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनीही निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. पक्षश्रेष्ठी आता जाधव आणि गांगुर्डे यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ टाकतात, याकडे लक्ष लागून राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Jadhav for the 'Permanent' chairmanship - Chungra in Gangurde