India China FaceOff: मालेगावचे सुपुत्र गलवान खोऱ्यात शहीद; सचिन मोरे यांना वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 13:34 IST2020-06-25T13:22:14+5:302020-06-25T13:34:02+5:30
काही सैनिक नदीत वाहून जाऊ लागले ही बाब तेथे तैनात असलेले शूरविर सचिन यांच्या लक्षात येताच प्रसंगावधान राख तत्काळ त्यांनी आपल्या जवानांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली.

India China FaceOff: मालेगावचे सुपुत्र गलवान खोऱ्यात शहीद; सचिन मोरे यांना वीरमरण
नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साकुरी झाप गावाचे भूमिपुत्र व भारतीय सेनेच्या एस-पी-११५ रेजिमेंटचे जवान अभियंता सचिन विक्रम मोरे यांना भारत-चीनच्या सीमेवरील गलवान खो-यातील नदीत आपल्या सहकारी जवानांना वाचविताना वीरमरण आले. त्यांचे पार्थीव शनिवारी (दि.२७) सकाळी त्यांच्या मुळगावी लष्करी वाहनाने दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मागील काही दिवसांपासून पुर्व लडाखमधील गलवान खो-यातील भारत-चीनच्या लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी सैन्याकडून कुरापती वाढल्याने तणाव निर्माण झाला आहे. या सीमेवर भारताच्या अद्याप वीसपेक्षा अधिक जवान शहीद झाले आहेत. भारत-चीन सैन्यामधील वाढता संघर्ष लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गलवान खोºयातून वाहणाºया एका नदीवर भारतीय सैन्याची एक तुकडी पूल उभारणी करत असताना अचानकपणे नदीत पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे पुल बांधणी करत असलेले काही सैनिक नदीत वाहून जाऊ लागले ही बाब तेथे तैनात असलेले शूरविर सचिन यांच्या लक्षात येताच प्रसंगावधान राख तत्काळ त्यांनी आपल्या जवानांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. दरम्यान, जवानांना वाचविण्यास त्यांना यश आले असले तरी दुर्दैवाने सचिन यांच्या डोक्याला दगडचा जबर मार लागल्याने त्यांना वीरमरण आल्याची माहिती सचिन यांच्या धाकट्या बंधूंना तेथील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे समजते.
सचिन हे एका शेतकरी कुटुंबातून भारतीय सैन्यात इंजिनिअर म्हणून दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुली व सहा महिन्यांचे बाळ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने साकुरी झाप गावातील मोरेवाडीसह संपुर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.