साधुग्रामच्या सुरक्षेची वाढली डोकेदुखी

By Admin | Updated: July 1, 2015 23:51 IST2015-07-01T23:50:58+5:302015-07-01T23:51:39+5:30

चोऱ्यांमुळे कंत्राटदार हैराण : सेक्टर एकमध्ये आगंतुकांकडून अस्वच्छता, दरवाजे गायब

The increased headache of Sadhugram safety | साधुग्रामच्या सुरक्षेची वाढली डोकेदुखी

साधुग्रामच्या सुरक्षेची वाढली डोकेदुखी

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनात उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता महापालिकेला सतावू लागला असून साधुग्राममधील शौचालयांचे दरवाजे, पत्रे तसेच नळ चोरीस जात असल्याने कंत्राटदारही हैराण झाले आहेत. सेक्टर एकमध्ये प्रामुख्याने तीनही आखाड्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याने लवकरात लवकर आखाड्यांच्या ताब्यात जागा देण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली असून प्लॉट वाटपानंतर सुरक्षिततेची जबाबदारी काहीशी कमी होणार आहे.
महापालिकेमार्फत तपोवनासह आसपासच्या सुमारे ३२५ एकर जागेवर साधुग्रामच्या उभारणीचे काम वेगात सुरू आहे. महापालिकेच्या मालकीच्या ५४ एकर जागेत सेक्टर एकमध्ये प्रामुख्याने तीनही आखाड्यांच्या निवासाची व्यवस्था राहणार असल्याने सेक्टर एकचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. याठिकाणी महापालिकेने शौचालय व स्नानगृहांचे कामही पूर्ण केलेले आहे. तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे सेक्टर २ व ३ मधील शौचालय-स्नानगृहाचे पत्रे उडाले होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले होते; मात्र सेक्टर एकला फारशी झळ पोहोचली नव्हती. त्याबाबत पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु आता पूर्णत्वाला आलेल्या सेक्टर एकमध्ये उभारण्यात आलेल्या शौचालय-स्नानगृहासह नळफिटिंग्ज, वीजफिटिंग्ज यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कंत्राटदारासह महापालिकेला सतावू लागला आहे. सिंहस्थाला अद्याप दीड महिना शिल्लक असताना अनेक पोटभरू साधूच्या वेशातील भिक्षुक शहरात दाखल होत असून काहींनी थेट साधुग्राममध्येच बिऱ्हाड मांडले आहे. सेक्टर वनमध्ये आगंतुकांकडून शौचालयांमध्ये घाण केली जात असल्याने अस्वच्छता दिसून येते. याशिवाय चोरट्यांनीही शौचालये-स्नानगृहांच्या शेडचे पत्रे आणि लोखंडी दरवाजे तसेच नळफिटिंग्ज, पाईप यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कंत्राटदारासह महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. अनेक ठिकाणी दरवाजे अर्धवट स्थितीत तोडलेले असून शौचालयांतील भांड्यांचेही नुकसान करून ठेवले आहे. साधुग्रामचा एकदाचा ताबा आखाड्यांकडे सोपविल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेची बव्हंशी जबाबदारी कमी होणार असल्याने महापालिकेला आता प्लॉट वाटपांची प्रतीक्षा लागून आहे. येत्या ५ किंवा ६ जुलैला आखाडा परिषदेची बैठक होण्याची शक्यता असून त्यात प्लॉट वाटपासंबंधी निर्णय अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The increased headache of Sadhugram safety