हिंदुत्व घ्या विकत, नरेंद्र मोदी मोफत!

By Admin | Updated: July 23, 2014 00:31 IST2014-07-23T00:08:51+5:302014-07-23T00:31:06+5:30

नमो इफेक्ट : बाजारपेठेत मोदींवरील चरित्र ग्रंथमालिका सुरूच

Hindutva buy, buy free from Narendra Modi! | हिंदुत्व घ्या विकत, नरेंद्र मोदी मोफत!

हिंदुत्व घ्या विकत, नरेंद्र मोदी मोफत!

नाशिक : केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ होऊन सव्वा दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही मोदी नावाची जादू अजूनही जनमानसात कायम असून, मोदींचे चरित्रगान गाणाऱ्या ग्रंथांचा ओघ बाजारात सुरूच आहे. नाशकात भरलेल्या एका ग्रंथप्रदर्शनात सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ पुस्तक खरेदीवर नरेंद्र मोदींचे पुस्तक मोफत देण्याची योजना राबविली जात आहे, तर मोदींवरील अन्य ग्रंथांनाही वाचकांकडून चांगली मागणी आहे.
लोकसभा निवडणुकीत घोंघावत आलेल्या मोदी नावाच्या चक्रीवादळात मोठ-मोठे वृक्ष उन्मळून पडले. लोकसभा निवडणुकीपूर्वी सोशल मीडियात मोदीपुराण सुरू असतानाच मोदींचे गुणगान गाणारे चरित्रपर ग्रंथ बाजारात दाखल झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरही या ग्रंथांना बाजारात चांगली मागणी आहे. सत्तारूढ झाल्यानंतर मोदी सरकारने काही कटू निर्णय घेतल्याने जनमानसात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या; परंतु मोदी इफेक्ट अजूनही ओसरलेला नसल्याचे त्यांच्यावरील ग्रंथविक्रीतून दिसून येत आहे. नाशिकमध्ये सार्वजनिक वाचनालयात सुरू असलेल्या ग्रंथप्रदर्शनात विक्रेत्याने मोदी इफेक्ट ‘कॅश’ करण्याची योजना आखली आहे. ‘एक पुस्तक विकत, एक पुस्तक मोफत’ या योजनेत सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथावर डॉ. रविकांत पागनीस व शशिकला उपाध्ये लिखित ‘नरेंद्र मोदी एक आश्वासक नेतृत्त्व’ हे पुस्तक मोफत दिले जात आहे. हेच पुस्तक संदीप वासलेकरांच्या ‘एका दिशेचा शोध’ या पुस्तकावरदेखील मोफत आहे. मोदींचा करिश्मा ‘कॅश’ करण्यासाठी काही लेखकही पुढे सरसावले आहेत. सध्या बाजारात नरेंद्र मोदी यांच्या चरित्रावर आधारित प्रदीप पंडित लिखित ‘एक श्रेष्ठ भारत’, सुनील माळी अनुवादीत ‘कहानी नमोची’, डॉ. गिरीश दाबके लिखित ‘नरेंद्रायन’, कुमार पंकज लिखित ‘महानायक नरेंद्र मोदी’, विनिता कुबेर लिखित ‘मोदीनामा’ तसेच शरद कुंटे लिखित ‘विकास पुरुष नरेंद्र मोदी’ आदि पुस्तके उपलब्ध आहेत. मोदींच्या चरित्रपर या ग्रंथांना वाचकांकडून चांगली मागणी असल्याचे अक्षरधारा प्रकाशनच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Hindutva buy, buy free from Narendra Modi!