पोलिसांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

By Admin | Updated: September 10, 2016 01:09 IST2016-09-10T01:09:30+5:302016-09-10T01:09:42+5:30

कायदा बदलाची मागणी : मोर्चामध्ये पोलीस कुटुंबीयांसह निवृत्त पोलीस संघटनेचा समावेश

Front of protest against police attacks | पोलिसांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

पोलिसांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

नाशिक : राज्यातील अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेबरोबरच जनतेचे रक्षण करणाऱ्या कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ विशेष म्हणजे दिवसेंदिवस या हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले असून या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी पोलीस कुटुंबीय, निवृत्त पोलीस कर्मचारी संघटना तसेच पोलीस बॉइज मित्रमंडळाने जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांकडे शुक्रवारी (दि़ ९) मूक मोर्चाद्वारे केली आहे़
पोलिसांवरील हल्ला हा कायद्यावरील हल्ला असून यामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होते आहे़ तर दुसरीकडे समाजात कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांचे मात्र मनोधैर्य चांगलेच उंचावत चालले आहे़ सद्यस्थितीतील अस्तित्वात असलेला कायदा, अंमलबजावणीसाठी हतबल, असहाय व कुचकामी ठरत असून त्यामध्ये बदल होणे गरजेचे आहे़ सर्वसामान्यांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे़
पोलिसांवरील या वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस बॉइज संघटना,सेवानिवृत्त पोलीस कल्याण प्रतिष्ठान संघटना, निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने पोलीस मुख्यालयापासून शिस्तबद्ध पद्धतीने पोलीस मुख्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चामध्ये पोलीसपत्नी आपल्या लहान मुलांसह सहभागी झाली होते़ या मोर्चेकऱ्यांनी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी बी़ राधाकृष्ण, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांना मागण्यांचे निवेदन दिले़
या मूक मोर्चामध्ये निवृत्त पोलीस अधिकारी रावसाहेब पोटे, चंद्रकांत बनकर, मधुकर वसावे, रमेश पाटील, शांताराम महाजन, सुरेश महाजन, एस़ ई़ येवले, आनंदराव पठाडे, देवेंद्र शिंदे, रामराव देशमुख, गजमल पाटील, अशोक कळमकर, श्रावण सोनवणे यांच्यासह पोलीस कुटुंबीय, मोबीन सय्यद, संदीप चव्हाण, युवराज पांडे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते़

Web Title: Front of protest against police attacks