मालेगावकरांना प्रतीक्षा पूरपाण्याची

By Admin | Updated: August 5, 2014 01:57 IST2014-08-03T21:18:23+5:302014-08-05T01:57:50+5:30

मालेगावकरांना प्रतीक्षा पूरपाण्याची

Farewell to Malegaonkar | मालेगावकरांना प्रतीक्षा पूरपाण्याची

मालेगावकरांना प्रतीक्षा पूरपाण्याची

 

राजीव वडगे

संगमेश्वर
मालेगाव शहरवासीयांना पावसाबरोबरच मोसम नदीच्या पूरपाण्याची प्रतीक्षा असून, मालेगावकर नागरिक चातकाप्रमाणे पूरपाण्याची वाट बघत आहेत.
मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीला सध्या गटार गंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोसम नदीचे पात्र पाणवेलींनी आच्छादिलेले दिसून येत असून, शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर नदीत सोडण्यात आले आहे. त्याशिवाय विविध झाडे- झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. घाण, कचरा नदीपात्रात टाकण्यात येत असल्याने नदीला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे मच्छरांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाली आहे. दुर्गंधीमुळे शहरवासीयांचे आरोग्य मोठ्या प्रमाणावर धोक्यात आले आहे. सायंकाळनंतर तर डास, मच्छरांचा मोठा उच्छाद असतो. नदी किनारी राहणारे नागरिक यामुळे हैराण झाले आहेत. याकडे महानगरपालिका प्रशासनाचे वा लोकप्रतिनिधींचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना कोणी वालीच राहिला नाही.
दोन दिवसांपूर्वी मोसम नदीत हरणबारी धरणाचे पाणी सोडण्यात आल्याची दवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दिली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र नदीला पूरपाणी काही आलेच नाही.
पूरपाण्यामुळे नदीतील घाण कचरा वाहून जाईल. नदीपात्र स्वच्छ होईल या आशेने नागरिक पूरपाण्याकडे डोळे लावून बसले आहेत. आरोग्यदायी ठरणारे पूरपाणी लवकर येवो यासाठी मालेगावकर देवाकडे प्रार्थना करीत आहेत. महानगरपालिका प्रशासन निष्क्रिय झाल्याने निसर्ग तरी आपल्या मदतीला धावून येईल या आशेवर सध्या नागरिक आहेत. (वार्ताहर)

Web Title: Farewell to Malegaonkar