Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Inspirational > आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा

आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा

Reema Terangpi : रिमाच्या दिवसाची सुरुवात ई-रिक्षाने प्रवाशांची ने-आण करण्यापासून होते, त्यानंतर ती कॉलेजला जाते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 17:52 IST2026-04-30T17:50:51+5:302026-04-30T17:52:24+5:30

Reema Terangpi : रिमाच्या दिवसाची सुरुवात ई-रिक्षाने प्रवाशांची ने-आण करण्यापासून होते, त्यानंतर ती कॉलेजला जाते.

assam girl Reema Terangpi drives e rickshaw to support family got first division | आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा

आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा

आसामच्या विश्वनाथ जिल्ह्यातील गजबजलेल्या रस्त्यांवर धावणाऱ्या ई-रिक्षाचा आवाज आता रिमा तेरांगपीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेक प्रवाशांसाठी ती केवळ एक चालक आहे, जी त्यांना त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचवते. मात्र आपल्या कुटुंबासाठी ती कठीण आर्थिक काळात मोठा आधारस्तंभ बनली आहे. आता रिमाने आपल्या शाळेचं आणि समाजाचं नाव मोठं केलं असून ती इतर मुलांसाठी एक प्रेरणादायी ठरली आहे. रिमाच्या कष्टाची आणि जिद्दीची संपूर्ण आसाममध्ये चर्चा होत आहे.

रिमाच्या दिवसाची सुरुवात ई-रिक्षाने प्रवाशांची ने-आण करण्यापासून होते, त्यानंतर ती कॉलेजला जाते. विश्वनाथ कॉमर्स सीनियर सेकेंडरी स्कूलची विद्यार्थिनी असलेली रिमा गेल्या एक वर्षापासून ई-रिक्षा चालवत आहे. तिने सांगितलं की, कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. उदरनिर्वाह करणं कठीण झालं होतं आणि अशा परिस्थितीत तिच्या शिक्षणाचा खर्च उचलणं पालकांना शक्य नव्हतं. अखेर रिमाने सर्व दबावांचा सामना करत ताळमेळ बसवला आणि ई-रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.

आई आजारी, वडिलांचा पाय मोडला

रिमाने सांगितलं की, तिच्या आईची प्रकृती अनेकदा खराब असते, आई आजारी असते. तर वडिलांचा पाय मोडल्यामुळे ते काम करू शकत नाहीत. कुटुंबाची आर्थिक अवस्था अत्यंत बेताची झाली होती. रिमाला चार बहिणी आहेत, ज्यामध्ये ती सर्वांत मोठी आहे. तिला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती, पण परिस्थितीमुळे शिक्षण सोडून काम करण्याची वेळ आली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना रिमा म्हणाली, "मला तर आपण उत्तीर्ण होऊ की नाही, याचीही खात्री नव्हती. मी कधीच विचार केला नव्हता की मला चांगले मार्क मिळतील."

पहाटे पाच वाजता ई-रिक्षा घेऊन घराबाहेर पडते

रिमाच्या मते तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. ती दररोज पहाटे पाच वाजता ई-रिक्षा घेऊन घराबाहेर पडते. प्रवाशांना सोडल्यानंतर कॉलेजची वेळ झाली की, ती त्याच ई-रिक्षाने कॉलेजला जाते. कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा प्रवाशांची ने-आण सुरू होते. इतकी आर्थिक चणचण असूनही तिच्या कुटुंबाला बाहेरून फारशी मदत मिळाली नाही. त्यांना केवळ आसाम सरकारच्या 'अरुणोदय योजने' अंतर्गत तिच्या आईला मिळणारा लाभ मिळत आहे.

झोपडीत राहतं कुटुंब

रिमाचं कुटुंब एका झोपडीत राहतं. घरात अभ्यासासाठी टेबल-खुर्ची तर लांबची गोष्ट, पण पुरेसा प्रकाशही उपलब्ध नाही. ज्या दिवशी निकाल लागला, त्या दिवशीही रिमाने आनंद साजरा करण्यासाठी वेळ न घालवता आपलं काम सुरू ठेवलं. तिच्या दिनचर्येत कोणताही बदल झाला नाही, कारण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजची कमाई आजही तितकीच महत्त्वाची आहे. तिचं पहिलं स्वप्न बी.कॉम. (B.Com) पदवी मिळवणं हे आहे, परंतु घराची परिस्थिती पाहता ती एखादा डिप्लोमा कोर्स करण्याचाही विचार करत आहे.

Web Title : माँ बीमार, पिता घायल; परिवार, शिक्षा के लिए ई-रिक्शा चलाती है 'वह'.

Web Summary : माँ बीमार, पिता घायल होने पर असम की रीमा तेरांगपी परिवार का समर्थन करने के लिए ई-रिक्शा चलाती है। वह वित्तीय कठिनाई के बीच शिक्षा के लिए कॉलेज के साथ काम करती है। उसका लचीलापन कई लोगों को प्रेरित करता है।

Web Title : Mother sick, father injured; she drives e-rickshaw for family, education.

Web Summary : Assam girl Rima Terangpi drives an e-rickshaw to support her family after her mother fell ill and her father was injured. She balances work with college, striving for education amidst financial hardship. Her resilience inspires many.