मीही छत्रपतींचा एक मावळाच...! 'राजा शिवाजी'निमित्त रितेश देशमुखने व्यक्त केल्या भावना
By ऋचा वझे | Updated: April 30, 2026 18:10 IST2026-04-30T18:09:29+5:302026-04-30T18:10:01+5:30
'राजा शिवाजी' हा रितेशचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सिनेमाबद्दल रितेश म्हणतो...

मीही छत्रपतींचा एक मावळाच...! 'राजा शिवाजी'निमित्त रितेश देशमुखने व्यक्त केल्या भावना
'राजा शिवाजी' या रितेश देशमुख लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत सिनेमाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. जिनिलिया देशमुख आणि जिओ स्टुडिओने सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमात मराठी तसंच हिंदीतील अनेक कलाकारांची फौज आहे. अख्खा सिनेमा रितेशने खांद्यावर उचलला आहे आणि त्याला सर्व कलाकारांनी तोडीस तोड साथ दिली आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यानिमित्ताने रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी 'लोकमत'शी दिलखुलास संवाद साधला
1 .'राजा शिवाजी' हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आज सत्यात उतरत आहे. काय भावना आहेत?
रितेश देशमुख - अगदी खरं आहे.. हा माझा एकमेव ड्रीम प्रोजेक्ट होता आणि आता स्वप्नपूर्तीकडे माझा प्रवास सुरु झाला आहे. महाराजांप्रति सर्वांच्या मनात जी भावना, आदर आहे तो दाखवण्याचा अनेक कलाकारांनी आपापल्या परीने प्रयत्न केला. एक मावळा म्हणून मीही प्रयत्न केला आहे. आज जरी ही वेशभूषा साकारुन महाराजांचं रुप पडद्यावर साकारण्याचं सौभाग्य मला मिळालं असलं तरी मी त्या रुपात त्यांचा मावळाच आहे.
'छत्रपती' हे अजय-अतुलचं गीत आज प्रत्येकाच्या ओठांवर आहे. या प्रतिसादाबद्दल काय सांगाल?
रितेश देशमुख - आज छत्रपती अँथम साँग व्हायरल होतंय. हा देवाचा आशीर्वादच आहे. अजय अतुल हे मला भावासारखेच आहेत. ज्या मेहनतीने त्यांनी गाणे बनवले तेच घेऊन आम्ही आज पुढे जात आहोत. हे गाणं आणि लोकांच्या मनातील ऊर्जा मॅच करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
'राजा शिवाजी' या शीर्षकामागची गोष्ट काय?
रितेश देशमुख - आम्ही या सिनेमासंबंधी जितके शीर्षक असतील ते सर्व आधीच नोंद करुन ठेवले होते. महाराजांची संपूर्ण शौर्यगाथा केवळ एका सिनेमातून दाखवता येऊच शकत नाही. त्यातील एक अंश घेऊन आम्ही सिनेमा बनवायचं ठरवलं. संभाजी महाराज हे महाराजांचे सख्खे थोरले बंधू होते हे खूप कमी लोकांना माहित आहे. एका कुटुंबाला १६३६ मध्ये माहुलीच्या तहावेळी पुणे सोडून कर्नाटकला जावे लागले. जहांगीर सोडावी लागली. हे सगळं महाराज लहानपणी बघत होते. त्यामुळे ही गोष्ट महाराजांची नसून संपूर्ण कुटुंबाची आहे. अफजल खान वधानंतर शिवाजी महाराजांची सर्वांनी दखल घेतली. त्यामुळे ‘शिवबा’ ते ‘राजा शिवाजी’ असा हा प्रवास आहे. म्हणून मी अतिशय नम्रपणे सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित हा 'राजा शिवाजी' सिनेमा आहे. टायटलमध्ये छत्रपती नाही म्हणून हा अवमान होत नाही. माझा राजा, आपला अभिमान आहे हा संदेश आम्ही देतोय.
सिनेमातील सीन्स, कथा लिहिताना काय काळजी घ्यावी लागली?
रितेश देशमुख - अजित वाडीकर, संदीप पाटील आणि मी सिनेमाचं लेखन केलं. प्राजक्त देशमुखने मराठी संवाद लिहिले आहेत. जयदीप यादवने हिंदीतील काही संवाद लिहिले आहेत. हा सिनेमा भव्य स्केलवर आपल्या भाषेसाठी, मातीसाठी, राज्यासाठी मराठी भाषेत बनवायचा हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. जर प्रयत्न प्रामाणिक असतील तर कुठेही भावना दुखावल्या जात नाहीत. तरी आम्ही याची सर्वतोपरी काळजी घेतली आहे.
रितेशला शिवरायांच्या लूकमध्ये पाहून कुटुंबाच्या काय भावना होत्या?
जिनिलिया - मला तर आतापर्यंत हे एक स्वप्नच वाटतंय. आम्ही घरी सगळेच भावुक झालो होतो. ‘छत्रपती’ गाणं मी आईला दाखवलं तेव्हा त्यांना अक्षरश: रडू कोसळलं. आपल्या राजाविषयीची जी भावना आहे ती त्यांच्याही मनात दाटून आली होती.
सिनेमात अनेक तगडे कलाकार आहेत. त्यांच्या निवडीची प्रक्रिया कशी होती?
रितेश देशमुख - मी खरोखर माणसं कमावली आहेत. इतक्या तगड्या कलाकारांनी मला काहीही न विचारता साथ दिली. अभिषेकला मी केवळ सिनेमा करतोय इतकेच सांगितले आणि त्याने काही ऐकायच्या आधीच होकार दिला. जितेंद्र जोशींनी तर माझ्यावर उपकारच केले आहेत. शूटच्या आदल्या रात्री आमचा एक कलाकार येणार नाही असे समजले. आम्ही जितूला मदतीसाठी फोन केला आणि तो एका फोनवर दुसऱ्या दिवशी सकाळी शूटसाठी हजर होता. संजय दत्त यांना पाहून तर सेटवर सगळे घाबरायचे इतके ते अफजल खानच्या भूमिकेत सामावून गेले होते. सिनेमात सलमान खानचीही भूमिका आहे. सलमानने मला ‘शूट कधी सुरु होतंय? माझी काय भूमिका आहे?’ असे स्वत:हूनच विचारले. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. ''माझ्याशिवाय तुझा सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही. तुझ्या सिनेमासाठी मी वर्षातले तीन दिवस वेगळे काढून ठेवतोच.'', अशी सलमानची प्रतिक्रिया होती.
सिनेमाच्या निर्मितीवेळी काही अडचणी आल्या का? तडजोड करावी लागली का?
जिनिलिया - मी कुठेही तडजोड केली नाही. ‘छत्रपती’ हे गाणे सर्वांच्या मनाला भिडणारे असणार हे माहित होतेच. मी माझ्या परीने स्केल मोठा दिसेल असा प्रयत्न केला. कधी कधी काय होतं तुम्हाला जसा सिनेमा बनवायचा तसा होत नाही. पण जर संधी मिळाली आहे तर तुम्ही ते गृहित धरता कामा नये. माझी संपूर्ण टीम खूप चांगली होती. आम्ही रोज सकाळी ४ वाजता शूट करायचो इतके सगळे शिस्तबद्ध होते. सर्वांनी अगदी आपलेपणाने या सिनेमात काम केलं.
सिनेमातील अॅक्शन सीन्स कसे डिझाईन केले?
रितेश देशमुख - डेव्हिड आणि मनोहर हे अॅक्शन दिग्दर्शक आहेत. डेव्हिड हे पोलंडचे आहेत. तीन वेळा भारतात येऊन त्यांनी स्टंट, अॅक्शन सीन्स डिझाईन केले. संतोष सिवन हे दिग्गज सिनेमॅटोग्राफर सिनेमाला लाभले. त्यांना आजपर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा दांडगा अनुभव आमच्या मागे आहे.
सिनेमाचा पुढील भाग येणार का?
रितेश देशमुख - हे तुम्हाला १ मे ला कळेलच.