द्वारका :आठ तासांच्या परिश्रमानंतर गॅस टँकर सुरक्षितरित्या उचलण्यास यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 17:02 IST2021-06-17T16:58:24+5:302021-06-17T17:02:13+5:30
दोन अतिरिक्त क्रेन मागविण्यात आले. घटनास्थळी क्रेन पोहचेपर्यंत दुपारी दीड वाजून गेले होते. तीन क्रेनच्या सहाय्याने टँकर उचलण्याचे प्रयत्न सुरु झाले. द्वारकेकडे येणारी सर्व वाहतुक अन्य रस्त्यांती वळविण्यात आली होती. दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास सुरक्षितरित्या टँकर उचलला गेला.

द्वारका :आठ तासांच्या परिश्रमानंतर गॅस टँकर सुरक्षितरित्या उचलण्यास यश
नाशिक : स्वयंपाकाचा गॅस वाहतुक करणारा गॅसने भरलेला टँकर नाशिकमार्गे सिन्नर एमआयडीसीकडे मार्गस्थ होत असताना द्वारका चौकात गुरुवारी (दि.१७) पहाटे अचानकपणे उलटला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याहीप्रकारची जीवीतहानी झाली नाही. हा टँकर पुन्हा उभा करण्यास सुमारे आठ तासांचा कालावधी लागला.
मुंबई येथून भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकरमध्ये (एम.एच.४३ बीजी ०६९९) गॅस भरुन चालक मोहम्मद जोहरअली खान हे नेहमीप्रमाणे टँकर घेऊन गुरुवारी मध्यरात्री नाशिकच्या दिशेने निघाले. साडेपाच वाजेच्या सुमारास ते द्वारका चौकात पोहचले. चौकातील वाहतुक बेटाभोवती वळण घेत पुणे महामार्गाच्या दिशेने जात असताना अचानकपणे एक दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक त्यांची वाहने घेऊन टँकरच्यासमोर आली आणि खान यांनी त्यांना वाचविण्यासाठी तत्काळ ब्रेक दाबला. यामुळे हॉर्स पॉवर पाइप नादुरुस्त होऊन टँकरचा एका बाजूला तोल गेल्याने टँकर उलटले. यामुळे टाकळीफाट्याकडून द्वारकेकडे येणारा समांतर रस्ता बंद झाला. भुयारी मार्गाजवळ टँकर उलटून पडला. पहाटेच्या सुमारास चौकात वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला.
तीन क्रेनचा वापर; दोन बंब सज्ज
दोन अतिरिक्त क्रेन मागविण्यात आले. घटनास्थळी क्रेन पोहचेपर्यंत दुपारी दीड वाजून गेले होते. तीन क्रेनच्या सहाय्याने टँकर उचलण्याचे प्रयत्न सुरु झाले. द्वारकेकडे येणारी सर्व वाहतुक अन्य रस्त्यांती वळविण्यात आली होती. दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास सुरक्षितरित्या टँकर उचलला गेला. गॅस गळतीचा धोका निर्माण झाल्यास आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ नियंत्रण मिळविता यावे, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मनपा अग्निशमन दलाचे मेगा बाऊजर बंबासह एका खासगी कंपनीचाही बंब व जवान घटनास्थळी हजर होते.