वेळेवर बैठका नसल्याने संचालक संतप्त

By Admin | Updated: September 29, 2016 01:29 IST2016-09-29T01:28:33+5:302016-09-29T01:29:02+5:30

आदिवासी विकास महामंडळ बैठक : विष्णू सावरांवर रोष

Due to lack of timely meetings, the operator was angry | वेळेवर बैठका नसल्याने संचालक संतप्त

वेळेवर बैठका नसल्याने संचालक संतप्त

नाशिक : लोकनियुक्त संचालक मंडळ असलेल्या आदिवासी विकास महामंडळाची वर्ष वर्षभर बैठकच होत नसल्याने आदिवासी विकास महामंडळ संचालकांच्या बैठकीत बुधवारी (दि.२८) आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना संचालक मंडळाच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे समजते.
येथील आदिवासी विकास आयुक्तालयाच्या इमारतीतील आदिवासी विकास महामंडळाच्या सभागृहात आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत या संचालक मंडळाची बुधवारी बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच आदिवासी विकास महामंडळाचे संचालक श्री दुधनाग, श्रीमती मीनाक्षी वडवेट्टीवार, माजी आमदार धनराज महाले यांनी वर्ष वर्षभर आदिवासी विकास महामंडळाची बैठक का झाली नाही? यास दोषी कोण? आम्हाला आदिवासी विकास महामंडळाच्या योजनांची माहिती मिळणार कशी? अशा प्रश्नांच्या सरबत्तीनेच बैठकीस सुरुवात केली. आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक नसल्याने तांत्रिक अडचणींमुळे बैठका वेळेवर घेता आल्या नसल्याचा खुलास आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी बैठकीत केल्याचे कळते. यापुढे नियमित दर दोन- तीन महिन्यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकांच्या बैठका घेण्यात येतील, असे बैठकीत जाहीर केल्याचे कळते. तीन तास चाललेल्या या बैठकीत आदिवासी विकास महामंडळ संचालकांनी विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे
कळते. बैठकीस आदिवासी विकास आयुक्त राजीव जाधव, अपर आयुक्त डी. के. पानमंद, महामंडळाचे संचालक ताराबाई माळेकर, माजी आमदार धनराज महाले, श्रीमती मीनाक्षी वडवेट्टीवार, श्री दुधनाग आदिंसह खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)

अधिकाऱ्यांवर कारवाई करू
नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीला माहिती न मिळाल्याने त्यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकावा लागला. याबाबत बैठकीनंतर आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना विचारणा केली असता, असे झाले असेल तर संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू, असे उत्तर त्यांनी दिले. तसेच काही तांत्रिक कारणास्तव आदिवासी विकास महामंडळाच्या नियमित बैठका घेता आल्या नसल्याची कबुली दिली.
 

Web Title: Due to lack of timely meetings, the operator was angry