गेल्या वेळची पुनरावृत्ती करू नका

By Admin | Updated: August 2, 2014 01:21 IST2014-08-02T01:19:25+5:302014-08-02T01:21:07+5:30

पालकमंत्र्यांचा सज्जड दम : दक्ष राहण्याचे आदेश; समन्वय साधण्याच्या सूचना

Do not repeat last time | गेल्या वेळची पुनरावृत्ती करू नका

गेल्या वेळची पुनरावृत्ती करू नका

नाशिक : पावसाची संततधार सुरूच असून, धरणाच्या साठ्यातही लक्षणीय वाढ होत आहे. अशा परिस्थितीत धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली तर पाटबंधारे, महसूल, महापालिका व पोलीस यंत्रणेने एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहून नियोजन करावे. काही वर्षांपूर्वी असमन्वयातूनच नाशिककरांना महापुराला सामोरे जावे लागले होते; त्याची पुनरावृत्ती करू नका, असा सज्जड दम पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिला.
पुणे जिल्ह्यातील माळीण येथे डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी पाटील यांनी जिल्ह्यातील पाऊस व धरणांची माहिती दिली. त्याचबरोबर आपत्ती निवारणार्थ करावयाच्या उपाययोजना व उपलब्ध साधनसामग्रीबाबत अवगत केले.
यावेळी भुजबळ यांनी पाटबंधारे खात्याला विशेष करून सूचना केल्या. पाऊस सुरू झाल्याने आता धरणांमध्ये पाणी साठणे सुरू झाले आहे. हवामान खात्याने आणखी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. त्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला जावा, प्रत्येक संबंधित अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी, रुग्णवाहिका, जेसीबी, क्रेन या सर्व बाबींची अगोदरच पूर्तता केली जावी, ज्या-ज्या ठिकाणी पाणवेली असतील त्या तातडीने काढून पाण्याचा मार्ग खुला करावा अशा सूचना करून भुजबळ यांनी, धरणातून पाणी सोडताना पाटबंधारे खात्याने महसूल, महापालिका व पोलीस यंत्रणेशी अगोदर संपर्क करून तशी माहिती द्यावी. पाणी सोडण्याचा निर्णय विचारपूर्वक घेऊन नदीकाठच्या नागरिकांना अगोदर अवगत करावे. या काळात कोणत्याही अधिकाऱ्याने मुख्यालय सोडू नये व रजेवर जाऊ नये, असे आदेशही त्यांनी दिले. बांधकाम खात्यानेही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे, साधन-सामग्रीची यादी तयार करावी, असेही भुजबळ यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, महापालिका आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर तसेच पाटबंधारे, बांधकाम, आरटीओ, लष्कर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Do not repeat last time