मराठा मोर्चाच्या तयारीसाठी जिल्ह्यात दौरा

By Admin | Updated: September 6, 2016 01:34 IST2016-09-06T01:33:41+5:302016-09-06T01:34:38+5:30

तालुकानिहाय बैठका : विविध समित्या स्थापन; काळजीपूर्वक नियोजन

District tour to prepare for Maratha Morcha | मराठा मोर्चाच्या तयारीसाठी जिल्ह्यात दौरा

मराठा मोर्चाच्या तयारीसाठी जिल्ह्यात दौरा

नाशिक : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ नाशिक शहरातून काढण्यात येणारा मराठा समाजाच्या मोर्चाच्या नियोजनासाठी सोमवारी कोअर कमिटीची बैठक होऊन मोर्चाच्या तयारीचा भाग म्हणून तालुकानिहाय दौरे करण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर शहरातून निघणाऱ्या या मोर्चाचा नाशिककरांना शक्यतो त्रास होऊ नये यासाठी पूरेपूर काळजी घेण्याचा भाग म्हणून विविध कमिट्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळी शासकीय विश्रामगृहावर बोलविण्यात आलेल्या बैठकीत प्रामुख्याने मोर्चाची तयारी व जनजागृती या विषयावरच चर्चा झाली. परंतु या बैठकीसाठी जिल्ह्यातून जवळपास पाचशेहून अधिक समाजबांधव उपस्थित राहिल्यामुळे मूळ नियोजनाची कोणतीही चर्चा न करता बैठक आटोपती घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी एका हॉटेलमध्ये बैठक होऊन त्यात नियोजनावरच चर्चा करण्यात आली. विशेष करून नाशिककरांना या मोर्चाचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे त्याचबरोबर मोर्चेकऱ्यांना पाणी, वैद्यकीय सुविधा, त्यांच्या वाहनांची सोय याबाबत मते जाणून घेण्यात आली. प्रत्येक तालुक्यात जाऊन जनजागृती करण्याचे ठरविण्यात आल्याने त्यासाठी त्या त्या तालुक्यातील मराठा समाजाच्या नेत्यामंडळीशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत तारखा ठरविण्यात येणार आहेत. ज्या समाज बांधवांनी देणग्या जाहीर केल्या, त्यासाठी समाजाच्या नावे बॅँकेत स्वतंत्र खाते उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुक्यातून येणाऱ्या समाज बांधवांना झेंडे, बॅनर्स पुरविण्याचे ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: District tour to prepare for Maratha Morcha