शहरात डेंग्यूचा प्रभाव कायम

By Admin | Updated: September 8, 2016 01:31 IST2016-09-08T01:31:08+5:302016-09-08T01:31:21+5:30

रुग्णसंख्येत वाढ : सहा दिवसांत ८० संशयित

Dengue has been affected in the city | शहरात डेंग्यूचा प्रभाव कायम

शहरात डेंग्यूचा प्रभाव कायम

नाशिक : शहरात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढतच असून गेल्या सहा दिवसांत ८० संशयित रुग्ण उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या आठ महिन्यांत शहरात डेंग्यूच्या १०९२ संशयित रुग्णांच्या रक्तनमुन्यांची तपासणी झाली असता त्यातील ४९४ रुग्णांना डेंग्यूच्या आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
शहरात डेंग्यूच्या आजाराचा प्रभाव अद्यापही कायम आहे. महापालिकेने गेल्या महिन्यात पेस्ट कंट्रोलचा ठेका दिल्यानंतर ठिकठिकाणी डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणी केली जात आहे तरीही डेंग्यूसह मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे.
गेल्या आठ महिन्यांत एक हजाराहून अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचा संशय होता. परंतु त्यातील ४९४ रुग्णांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले, तर चार संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. आॅगस्ट महिन्यात १८७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे, तर दि. १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत ८० संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यातील ३० संशयित रुग्णांच्या रक्तनमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यातील २२ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dengue has been affected in the city