‘परिंद्यां’साठी ‘तो’ धुंडाळतोय देश!

By Admin | Updated: April 1, 2016 00:12 IST2016-03-31T23:34:49+5:302016-04-01T00:12:01+5:30

असेही झपाटलेपण : राजस्थानच्या युवकाकडून पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्यांचा आगळा शोध

The country is going to inspire it for 'Parindya'! | ‘परिंद्यां’साठी ‘तो’ धुंडाळतोय देश!

‘परिंद्यां’साठी ‘तो’ धुंडाळतोय देश!

नाशिक : पैशांमागे धावण्याऐवजी स्वत:च्या मनासारखे जगणारी माणसे फार थोडी असतात. असाच एक अवलिया करिअर सोडून वेगळे काही करण्यासाठी देशाचा कानाकोपरा धुंडाळतो आहे... राहुल करणपुरिया असे नाव असलेला हा तरुण पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या देशभरातील ५२ व्यक्तींचा अक्षरश: पायाला भिंगरी लावून शोध घेत असून, त्यांना उजेडात आणण्याचे काम करीत आहे.
मूळ राजस्थानातील भिलवाडा येथील राहुल पालकांच्या इच्छेसाठी कर्ज काढून एमबीएचे शिक्षण घेत होता; पण त्याला पर्यावरणाची आवड असल्याने या शिक्षणात त्याचे मन लागत नव्हते. या अस्वस्थतेतूनच त्याने एमबीए अर्धवट सोडून उदयपूरच्या ‘स्वराज’ या पर्यावरणविषयक शिक्षण देणाऱ्या विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथले शिक्षण पूर्ण होत असतानाच त्याच्या डोक्यात ‘५२ परिंदे’ प्रकल्पाची कल्पना आली. पर्यावरण संवर्धनासाठी झटणारी देशातील ५२ माणसे शोधायची. त्यांच्यावर माहितीपट तयार करायचे आणि ते जगभरात पोहोचवायचे, अशी ही साधारण कल्पना. ही माणसे समोर आणल्यास त्यांच्यापासून तरुणांना प्रेरणा मिळेल, असा यामागचा उद्देश. त्यानुसार राहुलने गेल्या नोव्हेंबर महिन्यात भ्रमंतीला प्रारंभ केला. आतापर्यंत त्याने राजस्थान, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमध्ये भटकत सतरा ‘परिंदे’ शोधून काढले आहेत. महाराष्ट्रात फिरताना राहुल नुकताच नाशिकला येऊन पुण्याकडे रवाना झाला. त्याला हा प्रकल्प येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायचा आहे.
स्वस्तात स्वस्त वाहनाने प्रवास केला,
तरी या प्रकल्पासाठी एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी राहुलने काही पैसे उभे केले आहेत,तर जाईल तेथूनही मदत मिळत आहे.

Web Title: The country is going to inspire it for 'Parindya'!