Cloudy weather: Rains continue in the city | ढगाळ हवामान : शहरात पावसाची रिमझिम सुरूच

ढगाळ हवामान : शहरात पावसाची रिमझिम सुरूच

नाशिक : शहर व परिसरात मंगळवारी (दि.७) पहाटे पावसाने काही प्रमाणात विश्रांती जरी घेतली असली तरी दुपारपासून पुन्हा शहरासह विविध उपनगरांमध्ये सरींचा रिमझिम वर्षाव सुरू झाला. सकाळी अकरावाजेनंतर शहरातून सुर्यप्रकाश गायब झाला अन् ढगाळ हवामान तयार झाले.
मागील दोन ते तीन दिवसांपासून सतत हलक्या सरींचा वर्षाव शहर व परिसरात होत आहे. यामुळे बळीराजाही सुखावला आहे. पावसाने आठवडाभराच्या विश्रांतीनंतर का होईना हजेरी लावल्याने समाधानाचे वातावरण आहे. शहराच्या आजुबाजुला डोळ्यांना हिरवाई नजरेस पडू लागली आहे. डोंगरमाथ्यांवर विविधप्रकारच्या वनस्पतींनाही बहर येण्यास सुरूवात झाली आहे. प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी सुरू असल्याने भात लावणीलाही वेग आला आहे. बहुतांश आदिवसी शेतक्यांची भात लावणी पुर्णत्वासदेखील आली आहे.
शहरात मागील २४ तासांत २५.२ मिमी पाऊस पडला आहे. जूनच्या सुरूवातीपासून अद्याप ४०६ मिमी इतका पाऊस झाला आहे. तसेच गंगापूर धरण समुहातदेखील पावसाने मध्यरात्रीपासून जोरदार हजेरी लावली. तसेच मंगळवारी दिवसभरही पावसाच्या कधी हलक्या तर कधी मध्यम सरींचा वर्षाव या भागात सुरूच होता. गंगापूर-४०मिमी, अंबोली-४५ मिमी, काश्यपी-१५ मिमी, गौतमी-२९ मिमी इतका पाऊस पाणलोट क्षेत्रात मोजण्यात आला. यामुळे गंगापूर धरणात नव्याने ५१ दलघफू इतक्या पाऊसपाण्याची आवक झाली. सध्या धरणसाठा ४५.९१ टक्के इतका झाला आहे.



 

Web Title: Cloudy weather: Rains continue in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.