चेंबर दुर्घटना : मनपाच्या गलथान कारभाराचा अजीम बळी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 17:09 IST2019-12-02T17:07:24+5:302019-12-02T17:09:40+5:30
एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुकल्याच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार? असा प्रश्न येथील संतप्त रहिवाशांनी उपस्थित केला असून आजीम हा लहानगा प्रशासकीय उदासिनतेचा बळी ठरल्याची भावना व्यक्त केली.

चेंबर दुर्घटना : मनपाच्या गलथान कारभाराचा अजीम बळी?
नाशिक : महापालिकेच्या भूयारी गटारीच्या उघड्या चेंबरच्या बाबतीत अनेकदा ओरड केली जाते; मात्र असे चेंबर अपघात जोपर्यंत घडत नाही, तोपर्यंत संबंधित विभागाकडून बंदिस्त केले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वडाळागावातील सादिकनगर भागात अशाच एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुकल्याच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार? असा प्रश्न येथील संतप्त रहिवाशांनी उपस्थित केला असून आजीम हा लहानगा प्रशासकीय उदासिनतेचा बळी ठरल्याची भावना व्यक्त केली.
भूमीगत गटारींच्या चेंबरमध्ये पडून मजूरापासून प्राण्यांपर्यंत मृत्यूच्या अनेकदा घटना घडल्या आहेत; मात्र याबाबत महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. वडाळागावातील महेबुबनगर, सादिकनगर, साठेनगर हा स्लम परिसर आहे. या भागात बहुतांश चेंबरवरील ढापे गायब झाले असून मनपाने ते चेंबर बंदिस्त करण्याची मागणी वारंवार केली जाते, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशाप्रकारच्या दुदैर्वी घटना घडत असल्याचे येथील रहिवाशी लाला शहा, इरफान शेख, युनुस खान, फिरोज फारूखी, जबेर खान आदिंनी सांगितले. उघडे चेंबर वेळोवेळी मनपाच्या भूयारी गटार विभागाने बंदिस्त केल्यास लहान मुलांपासून मुक्या प्राण्यांपर्यंत कोणाचाही जीव जाणार नाही, असे नागरिकंनी म्हटले आहे.
‘त्या’ दोघींचे प्रसंगावधान पण...,
मनपाच्या उर्दू शाळेत इयत्ता दुसरीत शिकणारा आजीम जुबेर खान (७) हा चिमुकला साधारणत: आठवडाभरापुर्वी सादिकनगरमधील एका गल्लीत असलेल्या उघडल्या चेंबरमध्ये पडला. यावेळी आजिम जोरात ओरडला, त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तत्काळ सुरय्या शेख, जकिया शेख या महिलांनी चेंबरच्या दिशेने धाव घेतली. दोघींनी क्षणाचाही विलंब न लावता आजिमला कसेबसे तत्काळ बाहेर काढले. तोपर्यंत स्थानिक नागरिकांची चेंबरभोवती मोठी गर्दी जमली होती. चिमुकल्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत गुरूवारी (दि.२८) मालवली.
नुकसानभरपाईची मागणी
चिमुकला आजीमचा चेंबरच्या ढाप्यात कोसळून मृत्यू झाला. यास मनपाचा गलथान कारभार जबाबदार आहे. अजिमचे कुटुंब अत्यंत गरीब असून वडील फळविक्रेता आहे. अजिम अभ्यासात हुशार असल्याने सादिकनगरमध्ये तो सर्वांचाच लाडका होता. त्याच्या अचानकपणे जाण्याने मोठा आघात कुटुंबियांवर झाला. तसेच संपुर्ण परिसरात शोककळा व्यक्त होत आहे. या कुटुंबाला महापालिका प्रशासनाने नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.